Published on
:
26 Nov 2024, 4:23 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:23 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीत राज्यभर आलेल्या महायुतीच्या त्सुनामीत नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पुरता सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील 15 मतदारसंघांमध्ये निवडणूक रिंगणातील १९६ उमेदवारांपैकी तब्बल १६६ जणांना एकूण मतदानापैकी एक षष्टमांश अर्थात १६.६ टक्के मतेही मिळविता न आल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातील २८८ मतदान केंद्रांमध्ये दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधून ६९.१२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील १८ लाख ४१ हजार ३८१ पुरुष, १६ लाख ५६ हजार ८२९ महिला व इतर ४८ अशा एकूण ३४ लाख ९८ हजार २५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवारी (दि. २३) या निवडणुकीचा निकाल मतमोजणीतून जाहीर केला गेला. या निवडणुकीत १५ पैकी १४ मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार उभे केले होते. महायुतीचे सर्वच्या सर्व १४ उमेदवार निवडून आले. एमआयएमने मालेगाव मध्य मतदारसंघाची जागा कायम राखली. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचा या निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला जिल्ह्यातील एकही जागा मिळविता आली नाही. जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये राजकीय पक्ष तसेच अपक्ष असे एकूण १९६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लाडक्या बहिणींनी महायुतीला हात दिल्याने तसेच 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेने हिंदुत्वावादी मतांचे ध्रुवीकरण झाल्याने महायुतीच्या उमेदवारांवर अक्षरश: मतांचा पाऊस पडला. त्यामुळे अपवाद वगळता विरोधी उमेदवारांचे डिपॉझिटही वाचू शकले नाही. केवळ निवडून आलेल्या उमेदवारासह प्रमुख विरोधक अशा ३० जणांनाच एक षष्टमांशपेक्षा अधिक मते मिळू शकली. उर्वरित १६६ जणांचा पराभव मानहानीकारक होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
बोरसे, भुसे, ढिकलेंचा मत टक्का सर्वाधिक
बागलाण मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे दिलीप बोरसे यांना जिल्ह्यातील अन्य मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक ७७.७१ टक्के मते मिळालीत. नाशिक पूर्व : ॲड. राहुल ढिकले (भाजप) : ६४ टक्के, मालेगाव बाह्य : दादा भुसे (शिंदे गट) : ६१.१३ टक्के, नांदगाव : सुहास कांदे (शिंदे गट) : ५६.४८ टक्के, येवला : छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) : ५३.८५ टक्के, चांदवड : डॉ. राहुल आहेर (भाजप) : ४३.७८ टक्के, निफाड : दिलीप बनकर (अजित पवार गट) : ५४.५९ टक्के, सिन्नर : ॲड. माणिकराव कोकाटे (अजित पवार गट) : ५६.६८ टक्के, देवळाली : सरोज अहिरे (अजित पवार गट) : ४४ टक्के, नाशिक मध्य : प्रा. देवयानी फरांदे (भाजप) : ५२.६७ टक्के, नाशिक पश्चिम : सीमा हिरे (भाजप) : ५१.२७ टक्के, दिंडोरी : नरहरी झिरवाळ (अजित पवार गट) : ५३.६३ टक्के, कळवण : नितीन पवार (अजित पवार गट) : ४९.९४ टक्के, मालेगाव मध्य : मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल : ४५.६६ टक्के.
कोतवाल, मेंगाळ, चव्हाण, हिरे यांना धक्क
महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निभाव लागू शकला नाही. चांदवड मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, नांदगावमधून शिवसेना (उबाठा) चे गणेश धात्रक, मनसेचे अकबर सोनावाला, निफाडमधून प्रहार जनशक्ती पार्टीचे गुरुदेव कांदे, इगतपुरीतून मनसेचे काशीनाथ मेंगाळ, काँग्रेसचे लकी जाधव, देवळालीतून मनसेच्या मोहिनी जाधव, नाशिक पूर्वमधून मनसेचे प्रसाद सानप, नाशिक पश्चिममधून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे माजी महापौर दशरथ पाटील, मालेगाव बाह्यमधून शिवसेना (उबाठा) चे अद्वय हिरे, बागलाणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण, स्वाभिमानीचे प्रवीण पवार, मालेगाव मध्यमधून काँग्रेसचे एजाज बेग यांच्यासारख्या दिग्गजांचे डिपॉझिट जप्त झाले. नाशिक पश्चिमचा अपवाद वगळता मनसेला एकाही मतदारसंघातून डिपॉझिट वाचविता आले नाही. वंचित बहुजन आघाडी, बसपा, महाराष्ट्र निर्भय पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षांच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट वाचू शकले नाही.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना १० हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) मधील उमेदवाराला यातून काही सूट देण्यात आली आहे. या प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते.
काय आहे डिपॉझिट जप्तीचा नियम
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक लढविणारा उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ अर्थात १६.६ टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.