दिंडोरी : विजयानंतर आ. नरहरी झिरवाळांसोबत विजयोत्सव साजरा करताना कार्यकर्ते(छाया : अशोक निकम)
Published on
:
24 Nov 2024, 7:43 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:43 am
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी हॅट्ट्रिक साधली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांचा झिरवाळांनी 44,532 मतांनी पराभव केला. झिरवाळ यांना 1,38,442 मते, तर चारोस्करांना 93,910 मते मिळाली. अपक्ष उमेदवार सुशीला चारोस्कर यांना 9694, तर संतोष रेहरे यांना 4311 मते मिळाली.
नरहरी झिरवाळ : 138442
सुनीता चारोस्कर : 93910
सुशीला चारोस्कर : 9694
संतोष रेहरे : 4311
सकाळी आठ वाजता दिंडोरी येथील मविप्र कॉलेजमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यात झिरवाळ यांना 801 मते मिळाली, तर चारोस्कर यांना 688 मते मिळाली. पोस्टल मतांमध्ये झिरवाळांनी 113 मतांची आघाडी घेतली.
त्यानंतर ईव्हीएम मतांची मतमोजणी करण्यात आली. पहिल्याच फेरीत 942 मतांची आघाडी झिरवाळांना मिळाली. ती शेवटपर्यंत कायम राहिली. एकूण 32 फेऱ्या झाल्या. दुपारी 2 वाजता शेवटची फेरी पूर्ण झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी झिरवाळांच्या विजयाची घोषणा केली. त्यानंतर झिरवाळ मतदान केंद्रावर पोहोचले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते निवडीचे प्रशस्तिपत्रक घेऊन झिरवाळ मतदान केंद्राबाहेर येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी आ. धनराज महाले, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, प्रकाश शिंदे, नरेंद्र जाधव, भाजप तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे आदींसह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. विजयानंतर उघड्या जिपमधून नरहरी झिरवाळांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी जेसीबीवरून मोठा हार झिरवाळांना घालत आनंदोत्सव साजरा केला.
विरोधकांनी माझ्याविरोधात अपप्रचार केला. मलिदा गॅंग म्हणून हिणविले. मराठा विरोधी असल्याचे जनतेत रुजविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र जनतेला माझा स्वभाव चांगला माहीत असल्याने जनतेने मतदानरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे दिला. सर्व मतदारसंघातील जनतेचे आणि विशेष करून लाडक्या बहिणी, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभारी आहे.
आ. नरहरी झिरवाळ, दिंडोरी
जनतेने दिलेला कौल मान्य असून, यापुढील काळातही मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहीन.
सुनीता चारोस्कर, राष्ट्रवादी