आमदार कोकाटे यांनी 1,38,565 मते मिळवून सांगळे (97,681) यांच्यावर सुमारे 40 हजार 884 इतक्या प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवला. Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 10:52 am
Updated on
:
24 Nov 2024, 10:52 am
सिन्नर विधासभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार अॅड. माणिकराव कोकाटे व महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्यात चुरशीची लढत झाली. तथापि, आमदार कोकाटे यांनी 1,38,565 मते मिळवून सांगळे (97,681) यांच्यावर सुमारे 40 हजार 884 इतक्या प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवला.
मतदारसंघात विक्रमी 40,884 मतांनी विजयाचा विक्रम माणिकरावांच्या नावावर
आमदार कोकाटे यांनी घेतली 56.9 टक्के
उदय सांगळे यांना 40.1 टक्के मते
मिळालेली मते
ॲड. माणिकराव कोकाटे - 8,565
उदय सांगळे - 97,681
कोकाटे पाचव्यांदा विधासभेत पोहोचले आहेत. या निवडणुकीत सुमारे 74.85 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेला मतटक्का कोणाला धक्का देणार याबाबत मतदारसंघामध्ये चर्चा सुरू होती. सत्ताधारी महायुतीचे आमदार म्हणून माणिकराव कोकाटे यांनाच वाढलेल्या मतदानाचा फायदा झाल्याचे दिसून आले. पहिल्या फेरीपासूनच आमदार कोकाटे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मतांची ही आघाडी 16 व्या फेरीपर्यंत 42,366 पर्यंत पोहोचली होती. ती 17 ते 31 या फेर्यांदरम्यान रोखून धरण्यात उदय सांगळे यांना काहीसे यश आले. मात्र पिछाडीने त्यांची पाठ सोडली नाही. तोपर्यंत आमदार कोकाटे मोठे मताधिक्य घेत विजयासमीप पोहोचले होते. त्यांच्या केवळ औपचारिक विजयाची घोषणा राहिली होती. विजय समोर दिसू लागताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यास सुरुवात केली. विजयी घोषणाही सुरू केल्या होत्या. 23 व्या फेरीची मतमोजणी सुरू असताना मतमोजणीस्थळी आमदार कोकाटे यांचे आगमन झाले. विजयाची घोषणा झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. निवडणूक निरीक्षक गायत्रीदेखील उपस्थित होत्या.
खेड गटातील कवडदरा येथील बूथ क्र. 261 चे मतदान यंत्र बॅटरी डाउन झाल्याने बंद पडले होते. व्हीव्हीपॅट मशीन तपासणीनुसार त्यात 680 मते होती. आमदार कोकाटे व विरोधी उमेदवार सांगळे यांच्यातील मतांचा फरक 40 हजारांचा असल्याने या यंत्रातील मते मोजण्यात आली नाहीत. फरक एक हजारांच्या आत असता, तर मोजणी करावी लागली असती, असे निवडणूक अधिकारी भारदे यांनी सांगितले.
आमदार कोकाटे यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे मतमोजणी केंद्रात सुरुवातीपासूनच तळ ठोकून होत्या. आमदार कोकाटे यांचे केंद्रात आगमन झाल्यानंतर सीमंतिनी यांनी वडिलांना मिठी मारत अभिनंदन केले. कार्यकर्ते कुतूहलाने पाहात होते.
निवडणुकीत विरोधी उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर होऊनसुद्धा मतदारांनी विकासाच्या नावाने मतदान केले. विजयाने जबाबदार्या वाढल्या आहेत. त्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकाला खासदारांचे 80 टक्के मतदान पडले. नाही तर ते 25 हजारांवरच थांबले असते.
माणिकराव कोकाटे, आमदार
राज्यातील सर्व निकाल निवडणूक यंत्रणेवर शंका उपस्थित करणारे व न पटणारे आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या एक महिन्याच्या कार्यकाळात निवडणूक उभी केली. 97 हजार मतदारांचा आदर करून पुन्हा एकदा सामाजिक कामासाठी उभा राहीन.
उदय सांगळे, पराभूत उमेदवार