Published on
:
18 Nov 2024, 4:58 am
Updated on
:
18 Nov 2024, 4:58 am
ठाणे : आणीबाणीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ऐसीतैशी करणारी काँग्रेस आता संविधान बचावासाठी लोकांच्या मनात विष काळवत गावभर फिरत आहेत. संविधानाची मूलभूत तत्वे बदलताच येत नसून संविधान आम्ही बदलणार नाही, कुणाला बदलू देणार नाही आणि बदलण्याची कुणाची हिंमत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि.18) ठाण्यातील जाहीर सभेत ठणकावून सांगत आपण चांगल्या उपहारगृहात चवीसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जातो, त्यावेळी आपण जात पाहत नाही, मग आपले भविष्य ठरविणार्या निवडणूकीत आपण जात का बघतो, असा प्रश्नही उपस्थित केला.
ठाणे विधानसभेचे भाजप उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार (दि.18) ठाण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत गडकरी यांनी काँग्रेसच्या नीतीवर कडाडून टीका करीत त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अपेक्षित प्रगती झाली नसल्याचे सांगतिले. लोकसभ निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असा अप्रचार करण्यात आला. आम्हाला 400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला. परंतु आम्ही संविधान बदलणार नाही, बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही, असेही ते म्हणाले.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आणीबाणी लावून काँग्रेसने स्वतःच्या स्वार्थापोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची अनेक दुरुस्त्या केल्या. परंतु आमचे सरकार येताच आम्ही त्या दुरुस्त्यांमध्ये बदल केले. ज्या काँग्रेसने संविधानाची ऐसीतैशी केली, तीच काँग्रेस आता संविधान बचावासाठी विष काळवत गावभर फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जाहीर सभेत नितिन गडकरी यांचे भाषण ऐकण्यासाठी एकवटलेला जनसमुदायPudhari News Network
गडकरी-केळकरांचा गुरुद्वारा कमिटीने केला सत्कार
भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ तुफान गर्दीत झालेल्या गावदेवी मैदानातील जाहीर सभेत 37 संघटनांनी जाहीर पाठींबा दिला असताना ठाण्यातील गुरुद्वारा कमिटीने हजेरी लावत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे व्यासपीठावर जाऊन जंगी स्वागत केले. तसेच उमेदवार संजय केळकर आणि प्रताप सरनाईक यांचाही सत्कार केला.