परभणी (Parbhani):- शहरातील दररोजची वाहतुकीची वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रमुख मार्गावर दिवसातुन तीन ते चार वेळा वाहतूक कोंडी होते. यात अडकलेल्या वाहनधारकांचा वेळ, इंधन खर्च होत आहे. वाहतुक (transport) कोंडीवर शाश्वत पर्याय काढण्याची मागणी वाहनधारकांमधुन होत आहे.
रेल्वे स्टेशन, बसस्थानकातुन निघणार्या वाहनामुळे वाहतुकीला होतो अडथळा
कल्याण निर्मल हा एकमेव राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातुन जातो. मध्यवस्तीतुन जाणार्या या महामार्गावर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर वसमत – परभणी, गंगाखेड – परभणी, जिंतूर – परभणी, पाथरी – परभणी हे महामार्ग देखील शहराच्या मध्यवस्तीत येतात. यामुळे वाहतुकीची समस्या वाढली आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था चांगली नाही. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांची गती धिमी होते. त्यात बाह्यवळण रस्त्यासारखे पर्यायी मार्ग नसल्याने पादचारी, दुचाकी, चारचाकी तसेच इतर जड वाहनचालक हे एकाच रस्त्यावर येत आहेत. परभणी शहरातील बसस्थानक, उड्डाणपुल, काळीकमान, नारायणचाळ, जांब नाका, जेल कॉर्नर, नानलपेठ, अपना कॉर्नर, आर.आर. टावर, सुपर मार्वेâट, महात्मा फुले चौक या ठिकाणी दिवसातुन दोन ते तीन वेळा वाहतुक कोंडी होते. तासंतास या वाहतुक कोंडीत वाहनधारकांना अडकुन पडावे लागते. बसस्थानक ते उड्डाणपुल मार्गे गंगाखेडकडे जाणार्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानकातुन निघणार्या वाहनामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यात सध्या ऊस वाहतुकीची वाहने मोठ्या संख्येने धावत असल्याने वाहतुक कोंडी होणे वाढले आहे.