परभणी/गंगाखेड (Parbhani) :- येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सोयाबीन (Soyabean)खरेदी केंद्राची मुदत संपल्याने गुरुवार ६ फेब्रुवारी रोजीपासून हे खरेदी केंद्र बंद झाले. खरेदी केंद्राबाहेर रांगेत लागलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन भरलेली वाहने मात्र आहे त्या स्थितीत उभी असल्याने सोयाबीन खरेदी केंद्राला मुदत वाढ देऊन बंद काटा सुरु करून सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
गंगाखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या खरेदी केंद्रावरील स्थिती
गंगाखेड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सोयाबीन शासकीय हमी भावात खरेदी करण्यासाठी विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नागपूरच्या माध्यमातून गंगाखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या खरेदी केंद्रावर गुरुवार ६ फेब्रुवारी रोजीपर्यंत नाव नोंदणी करणाऱ्या १५८८ पैकी ४९५ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या ८१६२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. गुरुवार रोजी खरेदी केंद्र बंद करतांना रांगेत उभ्या वाहनातील सोयाबीन खरेदी न झाल्यामुळे या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी सोयाबीन घेऊन आलेल्या बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची वाहने रांगेत उभी वाहने आहे त्या स्थितीत खरेदी केंद्राबाहेर उभी राहिल्याने या वाहनाच्या खोटीचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. खाजगी संस्थेकडून सूरू केलेल्या तालुक्यातील अन्य खरेदी केंद्रावर ही अशीच परिस्थिती असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात असुन शेतकरी बांधवांचे नुकसान टाळण्यासाठी बंद झालेले सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्गातून केली जात आहे.