-सायं 5 वाजेपर्यंत 62.08 टक्के मतदान
– 14 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद.
– मतदारांमध्ये उत्साह
– प्रशासनाचे कौतुकास्पद नियोजन
परभणी/पाथरी (Pathari Assembly Election 2024) : पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का लोकसभे निवडणुकीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता असुन सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदान सुरु असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आली नसली तरी 70 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे . दरम्यान बुधवारी 14 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले आहे .
पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. परभणी तालुक्यातील कुंभारी येथील बूथ क्रमांक 33 व सोनपेठ तालुक्यातील खडका येथील बूथ क्रमांक 377 या दोन बूथ वरील ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या . निवडणूक प्रशासनाने तात्काळ दुसऱ्या ईव्हीएम मशीन ची व्यवस्था करून मतदान सुरुळीत सुरू करण्यात आले. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेले मतदान काही केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
लोकसभेपेक्षाही मतदारांचा उत्साह जास्त दिसून आला. पाथरी विधानसभा मतदार संघात 415 मतदान केंद्रावर 5 पर्यंत सरासरी 62.08 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. अंदाजे 70 टक्के पर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील 14 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालेले आहे.
सकाळपासून शहरी व ग्रामीण भागात बहुतांश मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या. सकाळ सत्रा मध्ये महिला मतदार घराबाहेर निघून उत्साहात मतदानासाठी मतदान केंद्रावर येत असल्याचे दिसून आले. सकाळी 9 वाजेपर्यंत दोन तासात 7.36 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांचा उत्साह कायम राहिला 11 वाजेपर्यंत 20.61 टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रावर दुपारपर्यंत रांगा कायम होत्या दुपारी 1 वाजेपर्यंत 34.61 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांची संख्या कमी दिसून आली तर काही केंद्रावर उत्साह कायम दिसून आला दुपारी 3 वाजेपर्यंत 48.80 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.08 टक्के मतदान झाले त्यानंतर शहरी भागात अनेक मतदारांनी उशिराने गर्दी केल्याने सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.
सखी पोलिंग बूथ महिला टीमची यशस्वी कामगिरी
महिला सक्षमीकरण करण्याची संधी महिला कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीवाडा पाथरी तेथील 176 केंद्र क्रमांक बूथ सखी पोलिंग बूथ म्हणून प्रशासनाने तयार केले या बुथवर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती या कामी महिला मतदान अधिकारी यांनी आपले काम चोख बजावले.
दिव्यांग कर्मचाऱ्यांची यशस्वी कामगिरी
दिव्यांग कर्मचारी यांच्यासाठी एक स्वतंत्र पोलिंग बूथ पाथरी शहरातील गट साधन केंद्र येथील १५५ केंद्र क्रमांकावर सर्व दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक केली होती या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी ही निवडणुकीच्या सर्व कामे व्यवस्थितरित्या पूर्ण केले.
निवडणूक निरीक्षक श्रीमती संचिता बिश्नोई यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन केली पाहणी
पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी, मानवत, सोनपेठ तालुका व परभणी ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक श्रीमती संचिता बिश्नोई यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्रावरील सर्व बाबींची बारकाईने पाहणी केली. सायं.6.40 वाजता पाथरी शहरातील बूथ क्रमांक 159 इंदिरा नगर येथील बूथ वरील टीम मतदान प्रकिर्या पूर्ण करून साहित्य घेऊन आली असता उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.रात्री उशिरापर्यंत इतर बूथ आपले मतदान साहित्य घेऊन येत होते सर्व अधिकारी कर्मचारी यांना रात्री रुचकर जेवणाची व्यवस्थाही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली होती.