Pune News:'एक पुणे' कार्डपासून पीएमपीचे प्रवासी वंचित

2 hours ago 1

प्रसाद जगताप

Pune Latest News: पीएमपी, मेट्रो, रिक्षासह अन्य वाहतूक सेवांचे तिकीट एकाच कार्डद्वारे म्हणजेच एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) द्वारे देण्याचे नियोजन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. यानुसार एक पुणे हे मेट्रो कार्ड सुरू केले आहे. परंतु पीएमपी व मेट्रोमध्ये समन्वय नसल्याने पीएमपीचे प्रवासी यापासून अजूनही वंचित राहिले आहेत.

या कार्डची सेवा पीएमपीएमएलच्या प्रवाशांना कधी मिळणार? असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. या कार्डला फक्त मेट्रोचीच कनेक्टिव्हिटी असून, अन्य पीएमपीएमएल, रिक्षा व अन्य वाहतूक सेवांची कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधानांच्या वन नेशन, वन कार्ड या प्रकल्पांतर्गत 2019 रोजी हे कार्ड लॉन्च करण्यात आले. देशातील काही शहरांमध्ये हे कार्ड सुरू आहे. पुण्यातही हे कार्ड मेट्रोकडून तयार करण्यात आले आहे. मात्र, त्या कार्डला अद्याप शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीएमएलची आणि रिक्षाचीही कनेक्टिव्हिटी नाही.

एकाच कार्डद्वारे मेट्रोसह पीएमपी, रिक्षाद्वारे प्रवाशांना प्रवास करता यावा, याकरिता हे कार्ड तयार करण्यात आले आहे. याबाबत मेट्रोला विचारले असता, आमची यंत्रणा सज्ज असून, पीएमपीकडून एकात्मिक (इंटिग्रेट) करणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे.

तर, पीएमपी प्रशासनाला विचारले असता, पीएमपीच्या (PMP) अ‍ॅपमधून आम्ही मेट्रो तिकीट कनेक्टिव्हिटी दिली असल्याचे सांगितले जात आहे. यावरून पीएमपी, मेट्रो अधिकार्‍यांचा समन्वय नसल्याचे समोर आले असून, या सेवेपासून प्रवासी वंचित राहत आहेत.

या राज्यांमध्ये आहे एनसीएमसी कार्ड

देशातील दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, तेलंगना, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही शहरांमध्ये एनसीएमसी कार्ड सुरू केले आहे.

मात्र, काही शहरांनी सार्वजनिक वाहतूक सेवा करणार्‍या बससेवेला कनेक्टिव्हिटी दिली आहे. तर, इतरांकडून अद्यापपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नाही. पुणे शहराचेही तसेच दिसत आहे. वन पुणे कार्ड आहे, पण ते पीएमपीला कनेक्ट केलेले नाही. ही सुविधा कधी सुरू होणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

पीएमपी, मेट्रो अधिकार्‍यांच्या चर्चेचे झाले काय?

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि मेट्रो अधिकार्‍यांची हे कार्ड कनेक्टिव्हिटीसंदर्भात मागे चर्चा झाली होती. मेट्रो एक पुणे कार्डची यंत्रणा, पीएमपीच्या यंत्रणेला कनेक्ट करण्यात येणार होती. त्या दृष्टीने पीएमपीकडून त्यांच्याकडील यंत्रणेत काही बदल केले जाणार होते.

त्यानंतर मेट्रो कार्ड तिकीट यंत्रणा पीएमपी तिकीट यंत्रणेशी जोडली जाणार होती. त्यामुळे पीएमपी, मेट्रो या दोन्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून एकाच कार्डद्वारे पुणेकरांना प्रवास करता येणार होता. या बैठकीचे, चर्चेचे पुढे काय झाले, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article