महापालिका निवडणुकांचा मार्ग होणार मोकळा pudhari
Published on
:
24 Nov 2024, 3:40 am
Updated on
:
24 Nov 2024, 3:40 am
Pune News: महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचना यासंदर्भात न्यायालयात झालेल्या याचिकांमुळे या निवडणुकांना स्थगिती मिळालेली आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर या निवडणुकांचे भवितव्य ठरणार होते. महायुती किंवा महाविकास आघाडी यांना काय कौल मिळतो, यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का, हेही ठरणार असल्याचे जवळपास निश्चित होते.
त्यानुसार महायुतीला राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात या तीनही पक्षांना पोषक वातावरण असल्याने पुढील सहा महिन्यांच्या आतच या निवडणुका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अनेक महापालिकांच्या प्रभागरचना आणि जिल्हा परिषद, पंचायती समिती यांच्या गट आणि गणरचना निश्चित झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर पुढची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. ते लवकरच सुरू होईल, असे भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पुण्यात पुन्हा प्रभागरचना
पुणे महापालिकेतील तीन सदस्य प्रभागरचना यापूर्वी करण्यात आली आहे. मात्र, उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र महापालिका करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.
महायुती टिकणार का?
राज्यात महायुतीच्या सरकारला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या तीनही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुकीत महायुती टिकणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.