Published on
:
24 Nov 2024, 5:13 am
Updated on
:
24 Nov 2024, 5:13 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन टप्प्यात आली असताना दिवाळीत भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवस ठोकलेला तळ निर्णायक ठरल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान देणाऱ्या अनेक बंडखोरांची समजूत काढल्याने महायुतीचा विजय जिल्ह्यात सुकर बनला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक वातावरण होते. विशेषत: भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात इच्छुकांचे मोठे पीक आले होते. अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिले होते. अशा परिस्थितीत महाजन यांनी संकटमोचकाची भूमिका पुरेपूर पार पाडली. महाजन यांनी व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे हे संदेश देण्यासाठी ऐन दिवाळीमध्ये नाशिक मध्ये तळ ठोकला. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांची चर्चा करून त्यांच्या समोरील अडचणी, बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी केल्यानंतर पुन्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत देखील थांबून निवडणूक रणनीती ठरवली. या सर्वांचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळाले. त्यामुळे महाजन समर्थकांनी नाशिकमध्ये जोरदार जल्लोष केला.
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडाचा झेंडा उगारणाऱ्या सात माजी नगरसेवकांसह १७ जणांवर भाजपने मतदानाच्या दोन दिवस अगोदर कारवाई केली. मतदानाच्या दिवशीही भाजपच्या काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केली. अशा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर आता भाजपकडून कारवाई केली जाणार आहे.