शहर भाजपसाठी पुन्हा ‘अच्छे दिन’; लोकसभेपाठोपाठ विधानसभेत घवघवीत यशFile Photo
Published on
:
26 Nov 2024, 4:46 am
Updated on
:
26 Nov 2024, 4:46 am
Pune News: शहरातील लढविलेल्या सर्वच्या सर्व विधानसभेच्या जागा मोठ्या बहुमताने जिंकल्याने शहर भाजपसाठी हा सुवर्णकाळ ठरला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील या यशामुळे पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरावर पकड मजबूत झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीचा मार्गही या यशामुळे आणखी सुकर झाला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या पुणे शहरात भाजपने कायम आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार अनिल शिरोळे यांचा तब्बल तीन लाखांच्या मताधिक्यानी झालेला विजय आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्वच्या सर्व आठ जागांवर मिळालेल्या विजयाने भाजपने शहरावर एकहाती पकड मिळवली. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने अनपेक्षितरीत्या 98 जागा मिळवत महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली होती.
त्यानंतर 2014 ते 2019 हा भाजपसाठी खर्या अर्थाने सुवर्णकाळ होता. मात्र, 2019 च्या लोकसभेत पुन्हा एकदा सव्वातीन लाखांच्या मतांनी विजय मिळवूनही विधानसभेला मात्र भाजपला हडपसर आणि वडगाव शेरी या दोन जागा गमवाव्या लागल्या. त्यानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या पराभवाची जबाबदारी कोणी स्वीकारायची इथपासून पुणे भाजपचा कारभारी कोण? असे अनेक प्रश्न या कालावधीत उभे राहिले होते. मात्र, या पराभवातून धडा घेत भाजपने पुन्हा कामाला सुरुवात केली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा झंझावात असतानाही आणि भाजपची अवस्था दयनीय असताना पुण्यात मात्र मुरलीधर मोहोळ तब्बल सव्वा लाखाच्या मतांनी विजयी झाले. त्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यांच्या निवडीने पुण्याला कारभारी मिळालाच.
मात्र, खरे आव्हान होते ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभेच्या निकालात पुणे, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या जागा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला होता. त्यातच पुन्हा कसबा पेठ खेचून आणण्याचे आव्हान होते. त्यानंतर निवडणूक जाहीर झाल्यावर खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंटच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला होता.
मात्र, तरी विद्यमानांना संधी देत भाजपने निवडणूक लढवली आणि निकाल हाती आल्यानंतर भाजपने काय करिष्मा केला, हे समोर आले. शहरातील लढविलेल्या सर्वच्या सर्व सहा जागा भाजपने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या.
कोथरूडसारख्या मतदारसंघात विजयी
मतांचा विक्रम झाला, तर खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठसारख्या जागाही दणदणीत मतांनी जिंकल्या. त्यामुळे खर्या अर्थाने भाजपसाठी पुन्हा अच्छे दिन आले आहेत. या यशामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना नक्की होणार आहे. फक्त त्यासाठी मिळालेल्या यशाने हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवावे लागणार आहेत.