पुसद (Pusad Assembly Elections): पुसद विधानसभा मतदारसंघ -81 करिता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या मतदान अधिकारी कर्मचारी यांना अकरा व बारा नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण पार पडले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर यांच्या मार्गदर्शनात सदर प्रशिक्षण पार पडले. यावेळी प्रशिक्षण घेत असलेल्या मतदान अधिकाऱ्यांसाठी टपाली मतदान सुविधा सुरू केली होती. टपाली मतदान सुविधा केंद्र 1वर 11 नोव्हेंबर च्या रात्री 10.30 वाजताच्या दरम्यान आरोपी संतोष सुधाकर भेदोडकर सहाय्यक भांडारपाल बेंबळा प्रकल्प यवतमाळ यांनी टपाली मतदान करताना मतपत्रिकेचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. सदरील कृत्य हे गोपनीयतेचा भंग करणारे असून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करता गोपनीयतेचा भंग केला.
या आशयाची फिर्याद वसंतनगर पोलीस ठाण्यात पुसद विधानसभा मतदारसंघ -81 चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या तर्फे नायब तहसीलदार विवेक इंगोले यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी संतोष सुधाकर भेदोडकर यांच्याविरुद्ध भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 128 व भारतीय न्याय संहिता कलम 223 बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम आडे करीत आहेत.