मतदानाची शनिवारी मतमोजणी होणार आहे.
Published on
:
22 Nov 2024, 1:46 am
Updated on
:
22 Nov 2024, 1:46 am
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची शनिवारी (दि. 23) मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी एक-दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांचे दुसरे प्रशिक्षण शुक्रवारी (दि.22) दुपारी चार वाजता मतमोजणी केंद्रावरच होणार आहे. याकरिता नियुक्त जवळपास 1 हजार 174 अधिकारी, कर्मचार्यांची गुरुवारी सरमिसळ करण्यात आली. त्यातून कोण अधिकारी, कर्मचारी कोणत्या मतदारसंघात नियुक्त करण्यात आला आहे, हे स्पष्ट झाले.यावेळी निरीक्षक मीर तारिक अली, राम कुमार पोद्दार, गगन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, मनुष्यबळ नोडल अधिकारी राहुल रोकडे, सर्व मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे आणि मतमोजणी निरीक्षक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.
कवाडे यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले. ईव्हीएम मतमोजणीसाठी 176 मोजणी पर्यवेक्षक, 186 मोजणी सहायक, 196 सूक्ष्म निरीक्षक आणि पोस्टल मतपत्रिका मतमोजणीसाठी 154 मोजणी पर्यवेक्षक, 308 मोजणी सहायक, 154 सूक्ष्म निरीक्षक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावर आवश्यक ती सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोल्हापूर दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघात मतमोजणी 16 टेबलवर होणार आहे. उर्वरित आठ मतदारसंघांत 14 टेबलवर मतमोजणी होईल. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रारंभी टपाली मतदनाच्या मोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल, त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला सुरुवात होईल. पहिली फेरी नऊच्या सुमारास जाहीर होईल, त्यानंतर पुढील प्रत्येक फेरी 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होईल. दुपारी एक-दोन वाजेपर्यंत मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.