विधानसभा निवडणूक File Photo
Published on
:
22 Nov 2024, 1:58 am
Updated on
:
22 Nov 2024, 1:58 am
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी कांटे की टक्कर पाहायला मिळाली. शिवाय मतटक्काही वाढला आहे. सरासरी 75 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेला मतटक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. येथे मनोज घोरपडे यांनी सत्ता परिवर्तन केले तर आ. बाळासाहेब पाटील यांचा बालेकिल्ला ढासळणार आहे. जर आ. पाटील यांनी सत्ता कायम राखली तर त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा कायम आहे, असे म्हणावे लागेल.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ कराड, खटाव, कोरेगाव व सातारा तालुक्यांत विस्तारलेला आहे. या मतदारसंघात 356 मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण 155359 पुरुष 150837 स्त्री व इतर 7 मतदार असे एकूण 306203 मतदार आहेत.2235 सैनिक मतदार आहेत. यापैकी 2 लाख 28 हजार 830 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 74.73 टक्के आहे. म्हणजे सरासरी 75 टक्के मतदान झाले, अशी माहिती कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, बाळासाहेब गावडे व डॉ. जस्मिन शेख यांनी दिली आहे.
या मतदार संघातील 356 मतदान केंद्रांपैकी18 केंद्रे शहरी भागात तर उर्वरित 338 केंद्रे ग्रामीण भागात होती. निवडणूक प्रशासनाने एकूण 44 झोन तयार केले होते. यावेळी या मतदारसंघातील लढत अटीतटीची पहायला मिळाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान आ.बाळासाहेब पाटील व भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा, शक्तिप्रदर्शन दोन्ही नेत्यांकडून करण्यात आले. विशेष म्हणजे लहान पक्ष व अपक्ष असे पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पण लक्षवेधी लढत आ.बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांच्यामध्ये झाली.
बसपाकडून श्रीपती कांबळे, वंचित बहुजन आघाडीकडून अन्सारअली पटेल, आरपीआयकडून सर्जेराव बनसोडे, राष्ट्रीय स्वराज सेनेकडून सीमा पोतदार, रासपकडून सोमनाथ चव्हाण, तर अपक्ष अजय सूर्यवंशी, दीपक कदम, निवृत्ती शिंदे, बाळासो पाटील, ता. कागल, बाळासो पाटील, ता.वाळवा, रामचंद्र चव्हाण, वसीम इनामदार, वैभव पवार हे उमेदवार निवडणूक मैदानात होते.
शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार वळणावर गेली होती. आ.पाटील यांची रहिमतपूर येथे तर मनोज घोरपडे यांची मसूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत मोठी सभा झाली होती. गावोगाव प्रचाराचा धडाका होता. मतदानादिवशीही मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती. या मतदान संघात सरासरी 75 टक्के मतदान झाले. यावेळी मताचा टक्का वाढल्याने येथे सत्ता परिवर्तन होणार की सत्ता कायम राहणार याबाबत राजकीय जाणकार आडाखे बांधू लागले आहेत. निकालाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ पडणार हे 23 रोजी कळणार आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
येथे सत्ता परिवर्तन झाले तर आ. बाळासाहेब पाटील यांचा या मतदार संघातील बालेकिल्ला ढासळणार आहे. जर आ.पाटील यांनी सत्ता कायम राखली तर त्यांच्या नेतृत्वाचा करिष्मा कायम आहे, असे म्हणावे लागेल. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केले आहे. त्यामुळे वाढलेला मतटक्का कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे शनिवारी स्पष्ट होईल.