Published on
:
15 Nov 2024, 6:32 am
Updated on
:
15 Nov 2024, 6:32 am
रायगड : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे, त्याचा फटका या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कृषीपूरक जोडधंद्याला बसतो आहे. जिल्हयात दूध संकलन करणार्या नोंदणीकृत 135 सहकारी संस्था आहेत. त्यातील 18 कार्यरत असून त्यांच्याकडून पूर्ण जिल्ह्यासाठी 1573 लिटर प्रतिदिन दूध संकलन होते, हे एकूण मागणीच्या अगदी शुल्लक प्रमाणात असून अवसायानात निघालेल्या 117 संस्था आहेत. याचा सर्वाधिक परिणाम दूध उत्पादनावर होत असून रायगडमध्ये दिवसाला पाच लाख लिटर दुधाची कमतरता भासत आहे.
जिल्ह्याला दररोज 8 लाख 30 हजार लिटर दुधाची गरज आहे. मात्र, जिल्ह्यात फक्त 3 लाख 38 हजार लिटर दूध उत्पादित होते. तर दररोज सुमारे 5 लाख लिटर दूध पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगडमध्ये येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये वाढते औद्योगिकीकरण यामुळे कृषी क्षेत्रावर आधारित विविध उद्योगांची घसरण होऊ लागली आहे. कृषी क्षेत्र कमी झाले आहे. यातून गुरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला. तर पर्यटन व्यवसायात मोठी संधी निर्माण झाल्याने तरुणवर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळला आहे. याचा मोठा फटका येथील दूध व्यवसायाला बसला. परिणामी मोठ्या ल्ह्यात प्रमाणात मागणी वाढत असतानाही रायगडमध्ये पुरेसे दूध उत्पादन होत नाही.
रायगड जिल्ह्यात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. एकेकाळी भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले आहे. मोठमोठया औद्योगिक वसाहती जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेती क्षेत्र कमी झाले आहे. शेती कमी झाल्याने मुबलक दूध, पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध होत नाही.
यामुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायही घटत चालला आहे. मुंबई, पुणेसारखी मोठी शहरे रायगड जिल्हयाच्या लगत असल्याने तरुण वर्ग नोकरीसाठी या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहे. कमी झालेली शेतजमीन धारणक्षमता, पर्यटन क्षेत्राचा निर्माण झालेला आर्थिकदृष्टया फायदेशीर पर्याय यामुळे तरुण वर्गाने दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घरोघरी पशुपालन कमी होऊन दूध उत्पादनात वाढ होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात दूध उत्पादन सहकारी संस्थांचाही विकास झाला नाही. परिणामस्वरूप रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस दुधाची टंचाई जाणवत आहे. आता ज्या संस्था अस्तित्वात आहेत त्यांनाही मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
फक्त 18 दूध उत्पादक सहकारी संस्था दूध उत्पादनवाढीसाठी सहकारी संस्था चांगले काम करतात. यासाठी राज्य शासनकडून काही सवलतीही या मोठ्या संस्थांना दिल्या जातात. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी वेगळ्या कार्यालयाची निर्मिती केलेली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये देशी गायी, संकरित गायी ह्यात आणि म्हैस वर्गीय जनावरांची एकूण संख्या कमी 2 लाख 39 हजार 131 आहे. यातील 30 टक्के जनावरे दूध देणारी आहेत. जनावरांद्वारे दररोज एकूण 3 लाख 37 हजार 977 लिटर दूध उपल्ध होते. जिल्ह्याला दररोज सध्या 8 लाख 29 हजार 773 लिटर दुधाची गरज आहे. रायगड जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणेप्रमाणे 26 लाख 34 हजार आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुधाची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र जिल्ह्यात दररोज फक्त 3 लाख 37 हजार 977 लिटर दूध उत्पादित होते. उर्वरित 4 लाख 91 हजार लिटर दूध दररोज पुणे, कोल्हापूर, नगर, गुजरात येथून रायगड जिल्ह्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत असून शेती क्षेत्र कमी होत आहे.
रायगडमधील दूध उत्पादन देणारे पशुधन
देशी गायी- 1 लाख 70 हजार 388 (यात दूध देणार्या 51 हजार 116), दूध उत्पादन- 2 लाखा 4 हजार 464
संकरित गायी - 6 हजार 518 (दूध देणार्या - 1 हजार 955), दूध उत्पादन- 21 हजार 505
म्हैस वर्ग - 62 हजार 225 (दूध देणार्या- 18 हजार 668), दूध उत्पादन - 1 लाख 12 हजार 8
एकूण- 2 लाख 39 हजार 131 (दूध देणारी- 7 लाख 71 हजार 739), दूध उत्पादन - 3 लाख 37 हजार 977.
जिल्हयातील तरुण नोकरीनिमित्त शहराकडे जात आहेत. जिल्ह्यात पर्यटन व्यवसायात मोठी संधी असल्याने अनेकजण पर्यटन व्यवसायाकडे वळत आहेत. तेथील पोषक वातावरण व मुबलक हिरवा चारा यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांची दूध उत्पादकता जास्त आहे. रायगड जिल्ह्यात शेतकरी अल्पभूधारक असून दुग्ध व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते. या सर्वाचा परिणाम येथील दुग्ध उत्पादनावर होत आहे.
- सुदर्शन पाडावे, प्रभारी अधिकारी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास विभाग, रायगड