मनमाड : जेसीबीच्या सहाय्याने पुलाची संरक्षक भिंत हटविताना रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी.Pudhari News Network
Published on
:
02 Feb 2025, 4:17 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:17 am
मनमाड : शहरातील मध्यवर्ती रेल्वे ओव्हर ब्रिजच्या उजव्या बाजूच्या सरंक्षक भिंतीला एका ट्रकने धडक दिल्यामुळे भिंत रेल्वे ट्रकच्या बाजूला कलल्याने ती रुळावर पडण्याच्या शक्यतेेने रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तातडीने जमीनदोस्त केली. गेल्या वर्षी याच पुलाची एक सरंक्षक भिंती कोसळली होती. त्यामुळे तब्ब्ल दोन महिने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात होता.
शहरातून पुणे-इंदौर महामार्ग जातो. या मार्गांवर अंकाई किल्ल्याजवळ एक आणि दुसरा शहराच्या मध्यभागी असे दोन रेल्वे उड्डाण पूल आहेत. अंकाई किल्ल्याजवळ असलेल्या पुला खालून दौंड-पुणे या मार्गावर 37 तर शहरातील मध्यभागी असलेल्या पुलाखालून मुंबई, दिल्ली,नागपूर, नांदेडकडे सुमारे 125 रेल्वे गाड्यांची दररोज ये-जा होते. दोन्ही पुलावरून रोज हजारो वाहन जातात. त्यात अवजड वाहनाचा समावेश आहे. दोन्ही पूल सुमारे 50 ते 60 वर्षा पूर्वी बांधण्यात आलेले आहे. हे दोन्ही पूल जुनाट आणि कमकुवत झाल्यामुळे ते वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहेत.
शनिवार (दि.1) शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरील एका सरंक्षक भिंतीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने ती भिंत रेल्वेरुळाच्या दिशेने झुकून कधीही कोसळण्याच्या मार्गांवर होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन भिंतीची पाहणी केल्यानंतर तिला तातडीने तोडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रेल्वेचा वीज पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. त्यानंतर जेसीबीने भिंत तोडण्यात आली. एक वर्षापूर्वी याच पुलाची एक सरंक्षक भिंत कोसळली होती. त्यामुळे 2 महिने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच पुणे-इंदौर महामार्गावर अंकाई किल्ल्याजवळ रेल्वेओव्हर ब्रिजची सरंक्षक भिंत तोडून एक ट्रक थेट रेल्वे रुळावर पडला होता.