‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जPudhari News Network
Published on
:
08 Feb 2025, 8:56 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:56 am
ठाणे : सन 2024- 2025 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी व बारावी बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेस सामोरे जाताना कॉपीमुक्त व भयमुक्त सामोरे जावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात दहावी करिता 338 परीक्षा केंद्र असून 1 लाख 3 हजार 718 तर बारावी परीक्षा करिता 197 परीक्षा केंद्र असून 1 लाख 21 हजार 244 विद्यार्थ्यी परिक्षेस प्रविष्ठ होत आहेत. परीक्षा कामकाज 20 परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे. शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक व आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आले आहे. तसेच तालुका व मनपा स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त जिल्हास्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्राना भेटी देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षेदरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणार्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे.
कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी
विशेष प्रयत्न म्हणून घेणार या बाबींची दक्षता...
जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल.
परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यकतेनुसार व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व आवश्यकतेप्रमाणे बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात आवश्यकतेप्रमाणे 144 कलम लागू करण्यात येईल.