Published on
:
21 Nov 2024, 5:42 am
Updated on
:
21 Nov 2024, 5:42 am
कल्याण : मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक विभागाकडून सोसायट्यामध्ये देखील मतदान केंद्र देण्यात आली आहेत. आजूबाजूच्या शाळांमध्ये असलेल्या दोन पेक्षा जास्त मतदान केंद्रावरील मतदारांचे विभाजन करत नव्याने केंद्र तयार करण्यात आली आहेत. मात्र यामुळे मतदारांची चांगलीच दमछाक झाली. मतदार यादीसह ऑनलाईन याद्यामध्ये दाखविलेल्या सेंटरवर मतदान बुथच नसल्याने मतदाराकडून मतदान केंद्राची शोधाशोध सुरु होती.
लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी मतदार याद्यामधून मतदारांची नावे वगळली गेल्याचा प्रकार घडल्याने मतदारांनी मतदान केंद्रासह निवडणूक कार्यालयावर गोंधळ घातला होता. यानंतर मागील चार महिन्यात निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी करण्यात आली असून आज सुरु असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदारांना यादीतील नावे सहजपणे मिळाल्याने मतदारांनी धन्यवाद दिले असले तरी मतदारांची वणवण कमी करण्याबरोबरच बुथवरील गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सोसायट्या मध्येच मतदान बूथ उभारण्यात आले आहेत. शहरातील अनेक सोसायट्यानी बूथसाठी सहकार्य केल्याने ज्या शाळांमध्ये दोन पेक्षा जास्त बूथ होते किंवा ज्या बूथवर गैरसोयी दिसत होत्या ते बूथ या सोसायट्यामध्ये स्थलांतरीत करण्या बरोबरच नव्याने निर्माण केलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची नावे जुन्या केंद्रावरून स्थलांतरीत करण्यात आली होती. मात्र यादीत मतदारांना आपले नाव जुन्याच मतदान केंद्रावर दिसत असल्याने हे केंद्र शोधायचे कुठे? असा प्रश्न मतदारांना पडला होता. बऱ्याच मतदारांची नावे एक किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या मतदान केंद्रावर असल्याचे शोध घेतल्यानंतर कळले. यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही इतक्या लांब बूथवर जाऊन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसले.
निवडणूक विभागाने मतदारांना उन्हात रांगा लावाव्या लागू नयेत यासाठी निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रावर शेडची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी कल्याण पूर्वेतील चेतना हिंदी शाळेच्या मतदान केंद्रावर मंडपच नसल्याने मतदारांना रस्त्यावर कडकडीत उन्हात लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या होत्या. या बाबत निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात आली मात्र आयत्या वेळी मंडपाची सुविधा उपलब्ध करणे शक्य नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बोगस मतदान करण्याचे प्रकार
कल्याण पूर्वेतील माणेरे परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघड झाला आहे. एकाच व्यक्तीने दुसर्या वेळी दुसर्या प्रभागातून नाम साधर्म्याचा फायदा घेत मतदान करण्याचा केलेला प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
कल्याण पश्चिमेत बोगस मतदान
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराच्या नावाने आधीच मतदान करण्यात आल्याची बाब उघड होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेर निवडणूक निर्णय अधिकार्याच्या परवानगीने या नागरिकांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. हा प्रकार दोन ते तीन बुथवर झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.