मुंब्रा - कळवा विधानसभा मतदारसंघPudhari News network
Published on
:
22 Nov 2024, 9:11 am
Updated on
:
22 Nov 2024, 9:11 am
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघात मतदानाची वाढलेली टक्केवारी ही महायुतीच्याच पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघात गेल्या 15 वर्षात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकासकामांमुळे कळव्यातील बहुतांश मतदारांचा कल मतदानापूर्वीसुद्धा महाविकास आघाडीकडेच होता. त्यामुळे मतदानात देखील हा कल उतरण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे लोकसभेतील भाजपने मुस्लिम विरोधातील घेतलेली भूमिका, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि मुस्लिम चेहरा असूनही मात्र महायुतीचा चेहरा म्हणून मुंब्रामध्ये नजीब मुल्लांना किती मतदारांनी पसंती दिली हे मुद्दे देखील या मतदारसंघात प्रभावी ठरले आहेत.
गेल्या तीन निवडणुकीतील विधानसभा मतदानाची टक्केवारी
2014 - 47.45
2019 - 47.25
2024 - 52.1
गेल्या निवडणुकीतील मतदान
उमेदवार पक्ष मिळालेली मते
जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी 1,09,283
दीपाली सय्यद शिवसेना 33,644
अबू फैजी आम आदमी पक्ष 30,520
मागील चार टर्ममधील आमदार
वर्ष आमदार पक्ष
2019 जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
2014 जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
2009 जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
2009 पूर्वी गणेश नाईक (बेलापूर मतदार संघ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
ठाणे महागनरपालिका क्षेत्रात असलेला परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडत नसलेला मतदारसंघ म्हणजे कळवा-मुंब्रा मतदारसंघ. 2009 पूर्वी हा मतदारसंघ बेलापूर मतदारसंघात मोडत होता. तेव्हा गणेश नाईक यांनी बरीच वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु, 2009 ला मतदारसंघांची पुनर्रचना झाल्याने कळवा-मुंब्रा नवा मतदारसंघ निर्माण झाला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हा मतदारसंघ आहे. आधी गणेश नाईक आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम ठेवला होता. मात्र राष्ट्रवादीतील फुटीमुळे पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी निवडणूक पाहायला मिळाली.
संपूर्ण कळवा पश्चिम, रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, पूर्वेकडील विटावा, सूर्या नगर, मुंब्रा, कौसा हे सर्व भाग या मतदार संघात येतात. भूमिपुत्र आगरी-कोळी बांधव आणि मुस्लिम समाज असे मिश्र मतदार येथे राहतात. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. गेल्या पंधरा वर्षांत जितेंद्र आव्हाडांनी येथे खूप कामे केली आहेत. म्हणून मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड निवडून आले होते.
महायुतीकडून मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांपासून मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. तसेच घड्याळ चिन्हावरच येथे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्हाचा फटका पडू नये यासाठी महाविकास आघाडीकडून पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. केलेल्या विकासकामांमुळे पारसिक, खारेगाव, कळवा परिसरात मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे दिसून आला. तर मुंब्य्रात लोकसभेतील भाजपची मुस्लिम विरोधातील भूमिका, मुस्लिम असूनही महायुती म्हणून नजीब मुल्ला यांचा असलेला चेहरा, रामगिरी महाराजांचे वक्तव्य आणि पारंपरिक मुस्लिम मतदार हा महाविकास आघाडीच्या आणि पर्यायाने जितेंद्र आव्हाड यांच्याच बाजूने राहण्याची जास्त शक्यता असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडीला अनुकूल होण्याची शकतात आहे.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1 लाख 9 हजार 283 मतानी जिंकले होते. तर, शिवसेनेच्या दीपाली सय्यद 33 हजार 644 मतांनी आणि आम आदमी पक्षाचे अबू फैजी यांना 30 हजार 520 मते मिळाली आहेत.
नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात या निवडणुकीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नजीब मुल्ला यांच्यासाठी या मतदार संघात प्रचारसभा घेतली. मुंब्य्रात 65 टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने होण्याची शक्यता असा अंदाज या मतदार संघातील जाणकारांचा आहे. त्यामुळे मुस्लिम बहुल मतदार संघ असलेला मुंब्रा कळवा मुस्लिम समाजातील उमेदवाराला संधी देतात की पारंपरिक आमदाराला पुन्हा निवडून आणतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.