व्हीनस चौक परिसरात धावत्या रिक्षावर हायमास्ट लाईट पोल कोसळला.Pudhari News network
Published on
:
27 Nov 2024, 8:57 am
Updated on
:
27 Nov 2024, 8:57 am
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 च्या व्हीनस चौक परिसरात धावत्या रिक्षावर हायमास्ट लाईट पोल कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी घडली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प चार मधील व्हीनस चौक परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सध्या रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या हायमास्ट लाईटचा पोल, त्या खालील माती खचल्याने कमकुवत झाला होता. अखेर सोमवारी सायंकाळी तो अचानक धावत्या रिक्षावर कोसळला. या अपघातामुळे रिक्षाचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी ठेकेदाराविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणे अक्षम्य आहे. संबंधित ठेकेदाराने पीडित चालकाला भरपाई द्यावी, अशी स्पष्ट भूमिका कदम यांनी घेतली आहे. परिसरातील नागरिकांनीही ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ते खोदल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यात आता अशी घटना घडल्याने आमची सुरक्षा धोक्यात आली आहे, असे नागरिकांनी सांगितले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पोल कोसळल्याची कारणमीमांसा तपासली जात आहे. ठेकेदाराविरुद्ध कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.