नव्या वर्षात भेटीला येताहेत नव्या दमाचे मराठी चित्रपट भेटीला येत आहेत instagram
Published on
:
25 Nov 2024, 7:33 am
Updated on
:
25 Nov 2024, 7:33 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - नव्या वर्षात प्रतीक्षा लागून राहिली आहे ती म्हणजे नव्या धाटणीचे आशय घेऊन येणाऱ्या मराठी चित्रपटांची २०२५ मध्ये अनेक नव्या दमाचे मराठी चित्रपट भेटीला येत आहेत. तुम्ही कोणते मराठी चित्रपट पाहणार?
अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणारा ‘जर्नी’ चित्रपट
एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली आहे. संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत. २९ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
प्रियदर्शनी इंदलकर-संतोष जुवेकरचा 'रुखवत' चित्रपट
महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व "रुखवत" या चित्रपटाद्वारे लोकांसमोर येणार आहे. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी या चित्रपटाचा धमाकेदार मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. रुखवत मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने पाहायला मिळणार असल्याची चाहूलही मिळतेय. संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. "रुखवत"मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवालद्वारे १३ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हास्य-विनोदाचा कल्ला करत येणार 'श्री गणेशा' चित्रपट
'श्री गणेशा' हा नातेसंबंधांतील धम्माल गंमती-जंमतीवर आधारलेला मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्ही घोषणा झाल्यापासून चर्चेत आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'श्री गणेशा' धमाल रोड ट्रीपचा आणि 'श्री गणेशा' फॅमिली एंटरटेनमेंटचा' असे म्हणत एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला 'श्री गणेशा' चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. सदानंद उर्फ टिकल्या आणि भाऊसाहेब पाटील यांच्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या प्रथमेश परब आणि शशांक शेंडे यांना दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी आजवर कधीही न दिसलेल्या रूपात सादर केले आहे. यात प्रथमेशसोबत मेघा शिंदेची जोडी जमली आहे. या सर्वांच्या सोबतीला संजय नार्वेकर आपल्या अनोख्या शैलीत धमाल करणार आहेच.
'श्री गणेशा'ची सिनेमॅटोग्राफी डीओपी हजरत शेख वली यांनी केली आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतरचना केली असून, त्यावर संगीतकार वरुण लिखते यांनी सुमधूर संगीतसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले असून, संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दीपक एस कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून सहदिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केले आहे.
"हॅशटॅग तदेव लग्नम" २० डिसेंबरपासून भेटीला
शुभम फिल्म प्रोडक्शनच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सिनेमात पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.
सिनेमाच्या टीझरमध्ये घरच्यांच्या सांगण्यानुसार दोन मध्यमवयीन 'तरुण तरुणी' लग्नासाठी 'पाहाण्याच्या कार्यक्रमा'निमित्ताने भेटत आहेत. यावेळी ते एकमेकांच्या वयाचा अंदाज बांधताना दिसत आहेत. टीझरमधील संवाद मजेशीर असून प्रेक्षकांच्या मनात घर करणार आहेत. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री या टीझरमध्ये खुलून दिसत आहे. त्यामुळे आता थोडीशी लेट पण एकदम थेट सुरू झालेली ही सफर पाहायला मजा येणार आहे. यात सुबोध भावे, तेजश्री प्रधान यांच्यासह प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून, निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत.
‘जिलबी’ १७ जानेवारीला भेटीला
गरम गरम ‘जिलबी’ ची गोड चव काही औरच असते. अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. अभिनेता प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या तिघांच्या जोडीला पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे आकर्षक असे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमधील कलाकारांचे लूक लक्ष वेधून घेणारे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांचे आहे. ‘जिलबी’च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने मनोरंजनाची भन्नाट मेजवानी त्यांनी आणली आहे. .
दिग्दर्शक नितीन कांबळे असून ‘जिलबी’चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही. दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.
'मिशन अयोध्या' चित्रपट 'या' दिवशी प्रदर्शित होणार
समीर रमेश सुर्वे लिखित - दिग्दर्शित आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपट २३ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. समीर रमेश सुर्वे यांनी यापूर्वी व.पु. काळे यांच्या लोकप्रिय कादंबरीवरील 'श्री पार्टनर', 'शुभलग्न सावधान', 'जजमेंट' या गाजलेल्या चित्रपटांचे लेखन दिग्दर्शन आणि 'शुगर सॉल्ट आणि प्रेम'चे संवाद लेखन तसेच भोजपुरीतील 'नचनिया' या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे.
'मिशन अयोध्या' चित्रपटाची कथा रामभक्ती आणि अयोध्या या ऐतिहासिक संदर्भात गुंफलेली असल्याने चित्रपटाबद्दल जनमानसात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीशी संबंधित इतर सदस्यांची नावे अद्याप गुपित ठेवली गेली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार, याबाबत सर्वांनाच कुतूहल आहे.
फसक्लास दाभाडे' हे इरसाल कुटूंब येणार प्रेक्षकांच्या भेटीला
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा २’ च्या यशानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे आता 'फसक्लास दाभाडे' हा जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली होती. अमेय वाघ, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासह निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये एक एकत्रित कुटूंब दिवाळी साजरी सादरी करताना दिसत आहे. यावरून हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा धमाका असणार हे कळतेय. मुळात हेमंत ढोमे यांचे चित्रपट हलक्या-फुलक्या पद्धतीने काहीतरी संदेश देणारे असतात. त्यांची एखादा संवेदनशील विषय उत्तमरित्या हाताळण्याची प्रगल्भता कमाल आहे. त्यामुळे हा चित्रपटही काहीतरी हटके असणार, हे नक्की!
या चित्रपटामुळे आनंद एल राय, क्षिती जोग आणि हेमंत ढोमे हे पुन्हा एकदा ‘झिम्मा २’ नंतर एकत्र येणार आहेत. २४ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.