Published on
:
17 Nov 2024, 4:30 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:30 am
लहान वयामध्ये गरोदर राहणं, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात हीदेखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत. अंग बाहेर येण्याच्या त्रासात बाईला काही लक्षणं जाणवू शकतात. पहिल्या टप्प्यात ओटीपोटात रग लागणं, कंबरदुखी, अंगावरून जास्त पांढरं जाणं, शारीरिक संबंधांच्या वेळी त्रास ही लक्षणं दिसतात.
कुठल्याही व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यात कु लैंगिक आरोग्य या पैलूचा समावेश असतो. म्हणूनच हा विषय समजून घेण्याची नितांत आवश्यकता असते. अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास, त्यावर उपचार न झाल्यास नंतर काही आजार उद्भवू शकतात. बाळंतपणानंतर बाईला विश्रांतीची गरज असते; पण तीही अनेकींना मिळत नाही. त्यामुळेदेखील काही आजार उद्भवतात. वेळच्या वेळी उपचार झाले, तर त्यातून पुढे निर्माण होणारी गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते.
असाच एक आजार म्हणजे अंग बाहेर येणं. अर्थात, गर्भाशय त्याच्या मूळच्या जागेवरून खाली येणं, खालच्या दिशेने घसरणं. गरोदरपण, बाळंतपण तसंच गर्भपाताच्या वेळी व त्यानंतर बाईने योग्य ती काळजी व विश्रांती घेणं आवश्यक असतं. परंतु, सामान्यतः बायकांना अशी विश्रांती मिळत नाही. लहान वयामध्ये गरोदर राहणं, एकामागोमाग एक अनेक बाळंतपणं किंवा वारंवार गर्भपात हीदेखील अंग बाहेर येण्याची कारणं आहेत. अंग बाहेर येण्याच्या त्रासात बाईला काही लक्षणं जाणवू शकतात. पहिल्या टप्प्यात ओटीपोटात रग लागणं, कंबरदुखी, अंगावरून जास्त पांढरं जाणं, शारीरिक संबंधांच्या वेळी त्रास ही लक्षणं दिसतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये ओटीपोटात जड वाटू लागतं. काही तरी निसटल्यासारखं वाटत राहतं. ओटीपोटात ओढ लागल्यासारखं दुखतं.
मांड्यांना रंग लागते.
अंगावरून पांढरं जातं. शरीरसंबंध करणं अवघड आणि दुःखद होतं. अर्थात, लक्षणं जाणून वेळीच सतर्कता दाखवली तर या पहिल्या दोन्ही टप्प्यांमध्ये व्यायाम आणि औषधं घेऊन अंग मूळ जागी जायला मदत करता येते. पण, या टप्प्यांवर उपचार घेतले नाहीत, तर आजार बळावतो आणि गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. याचा अर्थ असा की, आजार अंगावर न काढता वेळच्या वेळी उपचार घेण्याची दक्षता बायकांनी दाखवायला हवी.