Published on
:
28 Nov 2024, 7:31 am
Updated on
:
28 Nov 2024, 7:31 am
शहरातील मुठा नदीपात्रालगतच्या काही भागांत निर्माण झालेली पूरपरिस्थिती ही नदी पात्रात झालेली अनधिकृत बांधकामे आणि राडारोड्यामुळे झाली होती. महापालिकेच्या चौकशी समितीच्या अहवालातच ही कबुली देण्यात आली आहे. तर भविष्यात पूरपरिस्थिती रोखण्यासाठी अनधिकृत बांधकामे हटवून जलमार्ग रुंदीकरण करणे आवश्यक असल्याची शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खडकवासला धरणसाखळीसह पवना धरणातून मुळा-मुठा नदीपात्रांत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहरातील काही नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. त्यात प्रामुख्याने सिंहगड रस्त्यांवरील एकतानगरी, वारजे परिसर तसेच विश्रांतवाडी व येरवडा भागांत काही ठिकाणी पाणी शिरले. ही पूरपरिस्थिती नदी सुधारणा प्रकल्पाच्या कामामुळे झाली नसल्याची आरडाओरड काही स्वयंसेवी संस्थांसह राजकीय मंडळींनी केली होती. त्यावर चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी पालिकेच्याच चार अधिकार्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल प्रशासनाकडून उघड करण्यात येत नसल्याने त्यावर संशय निर्माण केला जात होता. मात्र, सजग नागरिक मंचाने अखेर हा अहवाल समोर आणला आहे.
पूर परिस्थिती रोखण्यासाठीच्या उपाययोजना
शहरातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने नदीपात्रातील अतिक्रमणे व राडारोडा तातडीने काढण्यात यावा, राडारोडा टाकणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. नदीकाठच्या पूररेषेच्या आतमधील बांधकामांवर नेहमी येणारी पूररेषा तसेच निळी व लाल पूररेषा ठळकपणे दर्शविण्यात यावी. तसेच नदीची वहन क्षमता वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. पूरक्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवावे आणि लाल व निळ्या पूररेषेत नियमांचे उल्लंघन करून बंधारे, रस्ते, छोटे पूल, रेल्वे पूल काढून टाकण्यात यावेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
मेट्रो, रेल्वे पुलांच्या बांधकामांचा फटका
नदीपात्रात मेट्रो प्रकल्प, रेल्वेचे पूल तसेच नदीपात्रातील पूल इत्यादींच्या बांधकामांमुळे नदीच्या प्रवाहाच्या क्षेत्रात अडथळे निर्माण होत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिरिक्त पावसामुळेही पूरस्थिती
पवना धरण, मुळशी धरण, खडकवासला या धरणांमधून पाणी सोडले जाते. या धरणांच्या खाली असलेल्या मुक्त पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त पाऊस पडल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
नदी सुधारणा कामाला ग्रीन सिग्नल
महापालिकेच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे पूरपस्थिती निर्माण झाल्याचा आरोप झाला असला, तरी प्रत्यक्षात चौकशी समितीच्या अहवालात या कामामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असेही कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे नदी सुधारणाच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
काय आढळले चौकशीत
प्रामुख्याने खडकवासला धरणातून 60 हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर शहरातील काही भागांत पाणी जात होते. मात्र, मोठी पूरपरिस्थिती उद्भवत नव्हती. परंतु काही वर्षांत नदीपात्रात अनधिकृतपणे झालेली बांधकामे, निर्माण झालेले विविध अडथळे, नदीपात्रात अनधिकृतपणे टाकला जाणारा बांधकामांचा राडारोडा, कचरा इत्यादी कारणांमुळे नदीची वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतून 35 ते 40 हजार क्युसेस पाणी सोडले तरी शहरातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते असे या अहवालात म्हटले आहे.