अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या हिंदुस्थानींना घेऊन निघालेले अमेरिकी लष्कराचे विमान बुधवारी दुपारी पंजाबमधील अमृतसरमध्ये उतरले. या विमानातून 104 हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेने मायदेशी परत पाठवले आहे. यात 13 बालकांसह 79 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे.
अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या हिंदुस्थानींमध्ये सर्वाधिक नागरिक हे हरयाणा व गुजरातमधील आहेत. या दोन्ही राज्यातील प्रत्येक 33 नागरिक परत आले आहेत. तर पंजाबमधील 30 नागरिक, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील प्रत्येकी तीन व चंदिगढ मधील दोन नागरिकांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या हवाई दलाचे C 17 या विमानाने 104 हिंदुस्थानींना घेऊन मंगळवारी टेक्सासमधील सॅन अँटोनिया येथून उड्डाण केले. ते विमान बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अमृतसरमधील श्री गुरू राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या कठोर निर्णयाचे परिणाम आता अमेरिकेत दिसत आहेत. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट टीमने 12 राज्यांमध्ये छापे घातले असून रिपब्लिकन राज्यांमध्ये सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. यात 1700 अवैध स्थलांतरित हिंदुस्थानीना बेड्या ठोकण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यातील 104 हिंदुस्थानींना घेऊन मंगळवारी अमेरिकेच्या हवाईदलाचे विमान हिंदुस्थानकडे रवाना झाले होते.