पिंपरी चिंचवड शहर मेट्रो स्टेशन्स्Pudhari
Published on
:
05 Feb 2025, 11:59 am
Updated on
:
05 Feb 2025, 11:59 am
मिलिंद कांबळे
पिंपरी : पुणे शहरातील मेट्रो स्टेशन्सच्या आकर्षक रचनांच्या तुलनेत, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्टेशन्स कमी आकर्षक असल्याने भकास दिसत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून मिळणारे प्रवासी उत्पन्न विक्रमी असूनही, पिंपरी-चिंचवडबाबत महामेट्रो कॉर्पोरेशनकडून दुजाभाव होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे शहराच्या तुलनेत, पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी अशी केवळ 7.5 किलोमीटर अंतर मेट्रो ट्रेन धावत आहे. तसेच, विस्तारीत मार्गात केवळ पिंपरी ते चिंचवड या 4.5 किलोमीटर अंतराच्या एकमेव मार्गाचा समावेश केला गेला आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही सहा मेट्रो स्टेशन्स आहेत. या सर्व मेट्रो स्टेशन्सचा आकार आयताकृती बंद डब्यासारखा आहे. कोणत्याच स्टेशनला आकर्षक सजावट केलेली नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर पडत नसल्याचा आरोप केला जात आहे.
पुण्यातील भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर त्या-त्या भागांत आकर्षक रचनाकृतींची लक्षवेधी मेट्रो स्टेशन्स तयार करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मात्र, मेट्रो स्टेशनच्या सजावट व आकर्षक रचनेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो नामविस्तारास प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. पीसीएमसी व भोसरी ही मेट्रो स्टेशन्सची चुकीची असूनही नाव बदलण्यास मेट्रोकडून अजिबात प्रतिसाद दिला जात नाही.
तसेच, महापालिकेने केलेल्या आकर्षक चौकांची रचना मेट्रोने बदलून टाकली आहे. मोरवाडी चौकात महापालिकेने केलेल्या सुशोभीकरणास मेट्रोच्या जिन्यामुळे रया गेली आहे. चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पिंपरी येथील कमलाक्रॉस बिल्डिंगसमोर अनेक वर्षांनंतर स्टेशनचा चौथा जिना तयार केला जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, मोरवाडीहून पिंपरीकडे जाणारा बीआरटी मार्ग बंद करण्यात आल्याने सर्व्हिस रस्त्यावरून बसेस धावत असल्याने कोंडीत भर पडत आहे.
पिंपरी मेट्रो स्टेशनकडून सर्वाधिक उत्पन्न महामेट्रोला मिळते आहे. असे असतानाही सुविधा देण्यावर उदासीनता दाखविली जात असल्याने शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पिंपरी ते निगडी मार्गावरील स्टेशन्सही साधेच असणार
पिंपरी ते निगडी या 4.5 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा विस्तारीत मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यासाठी 910 कोटी 18 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. या मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डीत खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प असे चार स्टेशन करण्यात येणार आहेत. हे स्टेशन भक्ती-शक्ती, मोरया गोसावी मंदिर, खंडोबा माळ, एमआयडीसी या संकल्पनेवर आधारीत असावेत, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. मात्र, खर्च वाचविण्याच्या नावाखाली हे स्टेशनही खूपच साधे असणार आहेत, असे महामेट्रोच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवडबाबत मेट्रोकडून भेदभाव
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी मोठा आर्थिक हिस्सा तसेच, जागा दिल्या आहेत. पुण्यातील भौगोलिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आकर्षक, रेखीव आणि देखणे स्टेशन तयार केले आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही स्टेशन असावेत. मात्र, तसे स्टेशन तयार केले नाहीत. पिंपरी-चिंचवडबाबत महामेट्रोकडून केला जात असलेला भेदभाव ताबडतोब थांबवावा. नवीन मार्गावर भक्ती-शक्ती शिल्प, मोरया गोसावी समाधी मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मेट्रोचे स्टेशन तयार केले जावेत. त्यासाठी खासदार, आमदार व राजकीय पदाधिकार्यांनी मेट्रो प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे. महापालिकेकडून घेतलेल्या जागेत तात्काळ पार्किंग विकसित करावी. नवीन मार्गाना मंजुरी दिली जावी. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडला सेवा आणि सुविधा न दिल्यास आंदोलन छेडले जाईल, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.
दुभाजकात रोपे न लावल्याने परिसर विद्रुप
शहरात मेट्रो 6 मार्च 2022 पासून धावत आहे. मात्र, अद्याप मेट्रोने दुभाजकात माती टाकून झाडे व रोपे लावलेली नाहीत. पिलर स्वच्छ केले जात नसल्याने धूळ व पावसाचे पाणी साचून ते घाणेरडे दिसत आहे. मेट्रोने बांधलेले दुभाजक अनेक ठिकाणी तुटले आहेत. तसेच, काँक्रीटच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनखालील दुभाजक न लावल्याने पादचारी धोकादायकरित्या ग्रेडसेपरेटरचा मार्ग ओलांडतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. स्टेशनखालील झाडे व रोपांची निगा न राखल्याने ती जळून गेली आहेत. तसेच, काही स्टेशन खाली प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळेत अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.