Published on
:
01 Feb 2025, 5:24 am
Updated on
:
01 Feb 2025, 5:24 am
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे पहिले पूर्ण बजेट बित्तीय वर्ष २०२५-२६ साठी लोकसभेत सादर करणार आहेत. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना दही-साखर खाउ घातली. लोकसभेच्या पटलावर अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात जात त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या दरम्यान अर्थमंत्रींनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी मागितली. यावेळी अर्थसंकल्पाला मंजुरी देताना राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांना दही साखर खाउ घालून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती कार्यालयाने एक्स अकाउंटवर काही फोटोही शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, "केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या टीमला. शुभेच्छा दिल्या"
दही आणि साखर का खायला दिली जाते ते जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार, भारतात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी दही आणि साखर खाऊ घालण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की दही आणि साखर खाल्ल्याने कामात यश मिळते. वास्तविक, दही हे पवित्रता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते, तर साखर गोडपणा आणि समरसतेचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत दही आणि साखरेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री राष्ट्रपतींना भेटतात आणि त्यानंतर राष्ट्रपती अर्थमंत्र्यांना दही आणि साखर खाऊ घालतात आणि त्यांना अर्थसंकल्पासाठी शुभेच्छा देतात. ही परंपरा पूर्ण झाल्याने अर्थसंकल्प सादर करण्याची रीतसर परवानगीही देण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी त्यांनी सलग सात वेळा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला होता. त्यांनी सहा पूर्णवेळ आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत. सीतारामन यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सलग आठ अर्थसंकल्प सादर केले आहेत. सीतारामन 2019 मध्ये देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री बनल्या. याआधी इंदिरा गांधी या पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या, ज्यांनी अर्थमंत्री म्हणून 1970-71 चा अर्थसंकल्प सादर केला होता.