कोंबड्यांचे नमुने घेताना वैद्यकीय अधिकारी.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 4:37 pm
Updated on
:
24 Jan 2025, 4:37 pm
लातूर : उदगीर येथील बर्ड फ्ल्यू बाधित कावळ्यांच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील घेण्यात आलेल्या कोंबड्यांच्या विविध नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी (दि२४) लातूर येथील पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. तेथील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.
उदगीर येथे काही दिवसांपूर्वी हुतात्मा स्मारक बालउद्यान, महात्मा गांधी उद्यान येथील कावळे मरत होते. यात मोठ्या प्रमाणात कावळे मरण पावले. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने दखल घेत कावळ्याच्या रक्ताचे नमुने तसेच मृत कावळे औंध येथील प्रयोगशाळेत निदानासाठी पाठवले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. विशेष म्हणजे खबरदारी म्हणून हेच कावळे व त्यांचे रक्तनमुने पुर्नतपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवले होते. तेथील अहवालात कावळ्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे आढळले होते. त्यानंतर उदगीर मधील काक मृत्यू घटनास्थळ सील करण्यात आले होते. व घटनास्थळापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील असलेल्या पोल्ट्री फॉर्ममधील तसेच घरगुती कोंब्ड्यांचे रक्त, नाक व घशातील द्राव तसेच विष्ठेचे नमुने निदानासाठी घेण्यात आले होते. ते औंधच्या प्रयोगशालेत पाठवले होते. या ४८ विविध नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी दुपारी मिळाला. तो अहवाल निगेटिव्ह असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगितले.