अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक संघटनांनी, एवढंच नाही तर शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं आहे. एवढंच नाही विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अभिनेत्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे.
भांडारकर संस्थेत विश्वस्तपदाचा राजीनामा स्वीकारला
मात्र आता राहुल सोलपूरकर ज्या भांडारकर संस्थेत विश्वस्तपदावर होते त्याचा राजीनामा संस्थेन मागितला होता. राहुल सोलपूरकर यांनी त्यांचा विश्वस्तपदाचा राजीनामा दिला असून संस्थेनं तो स्वीकारही केला आहे.
काय होतं प्रकरण?
“छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते. परंतु, पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून महाराष्ट्रात आले होते,” असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विविध पक्ष तसंच संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचारही घेतला. भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी एकत्र येत निषेध नोंदवला होता.
आंदोलकांकडून राजीनाम्याची मागणी
भांडारकर संस्थेबाहेर मराठा समाज आणि शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आंदोलकांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे राहुल सोलापूरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. मात्र, संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता, त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले होते. निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी संस्थेच्या मुख्य गेटच्या बाहेर रोखले होते. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले होते. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली होती.
संस्थेच्या भूमिकेचीही चौकशीची मागणी होती
आंदोलकांनी संस्थेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संस्थेने आधी स्पष्ट करावे की, राहुल सोलापूरकर यांच्या विधानाशी ते सहमत आहेत का?” असा सवाल आंदोलकांनी केला होता. जर संस्था सहमत नसेल, तर त्यांच्या तातडीच्या राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. एवढच नाही तर संस्थेबाहेर वाढत्या तणावामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ संवादाचा प्रयत्न झाला, मात्र तो निष्फळ ठरला. आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. राजीनामा न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला होता.
संस्थेनं विश्वस्तपदाचा राजीनामा मागितला होता
मात्र त्यांच्यावरचा रोष पाहता आणि त्यांच्याविरोधातील आंदोलन पाहता ते ज्या भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदी होते त्या पदाचा त्यांच्याकडून राजीनामा मागण्यात आला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून संस्थेनं त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.