आंबेगावला मताधिक्य न मिळालेले गावनेते रडारवरPudhari
Published on
:
27 Nov 2024, 3:56 am
Updated on
:
27 Nov 2024, 3:56 am
Manchar News: आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना अनेक गावांमध्ये मताधिक्य कमी पडले. ज्या गावात मताधिक्य कमी पडले, त्या गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकास्तरावर संस्थावर काम करणार्या पदाधिकार्यांनी स्वतःहून राजीनामे द्यावेत किंवा पक्षश्रेष्ठींनी त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे.
आंबेगाव विधानसभा निवडणुकीत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा विजयाची माळ पडली असून त्यांचा विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी ते निवडून येण्यासाठी लागणारे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत.
वळसे पाटील यांच्याबरोबर गेल्या अनेक वर्ष काम करणारे व विविध पदे भूषवणारे पक्षाचे गावपातळीवरील नेते, पदाधिकारी यांनी त्यांच्या गावात चांगल्या पद्धतीने काम न केल्यामुळे वळसे पाटील यांचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे तालुका पातळीसह गाव पातळीवर पक्षाची पदे असणार्या व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वळसे पाटील यांनी पदमुक्त करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आंबेगाव तालुक्यात गेले 35 वर्ष दिलीप वळसे पाटील हे आमदार म्हणून काम करत असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदे देखील भूषवले आहेत. 35 वर्षाच्या राजकारणात आंबेगाव तालुका सुजलाम-सुफलाम करण्याचे काम त्यांनी केले असून आदिवासी भागापासून ते शिरूर तालुक्यातील 42 गावापर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी दिला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वळसे पाटील यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, तालुक्यातील सर्व गावांमध्ये वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे यांच्या जोरावर वळसे पाटील निदान 40 ते 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून येतील, अशी आशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होती; मात्र वळसे पाटलांचा विजय हा अतिशय कमी मताधिक्य घेऊन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वळसे पाटील यांना मानणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
गेल्या अनेक वर्ष वळसे पाटील यांच्याबरोबर काम करणार्या पक्षाच्या विविध पदाधिकारी, गाव पातळीवरील नेते यांनी दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पूर्ण केली नाही. आपल्या गावातून वळसे पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले नाही असा आरोप आता सर्वसामान्य कार्यकर्ते करू लागले आहेत.
वळसे पाटलांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष विवीध पद उपभोगणार्या पदाधिकार्यांना वळसे पाटील यांनी पदावरून काढून टाकावे. त्या ठिकाणी नवीन चेहर्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तालुक्यात वळसे पाटलांचे तेच तेच पदाधिकारी असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत.
वळसे पाटलापर्यंत हे कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांना पोहोचू देत नाहीत, असे आरोप देखील होत आहेत. त्यामुळे वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधावी, अशी मागणी सुद्धा कार्यकर्ते करीत आहेत.