महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा तालुक्यात कांद्याची विक्रमी लागवड झाली असली, तरी बदलत्या वातावरणामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची अपेक्षा कांदा उत्पादक शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यंदा बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला बुरशी, मर, करपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी रासायनिक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. मजुरांची कमतरता असल्याने खुरपणी शक्य होत नसल्याने तणनाशकांचा बेसुमार वापर होत आहे. त्यात रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आंबेगाव तालुक्यात सुमारे 5 हजार 800 हेक्टरवर रब्बी व उन्हाळी कांदा लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 30 टक्के जास्त कांदा लागवड झाली आहे. मात्र, सध्या बदलत्या वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कांद्यावर बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी
पंधरा दिवस ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा, मर, मावा, बुरशी असे रोग दिसून आले. त्यामुळे औषधफवारणी करावी लागली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला.
- तानाजी मास्तर चासकर, कांदा उत्पादक, महाळुंगे पडवळ
ढगाळ वातावरणामुळे कांदारोपांची वाढ झाली नाही. वेगवेगळी बुरशीजन्य औषधे फवारण्यात आली. यंदा कांदा पिकाला साल नाही. त्यामुळे उत्पादन कमी आणि उत्पादन खर्चात वाढ, अशी परिस्थिती आहे.
-नारायण पाटील हुले, कांदा उत्पादक, नारोडी