Akshay Shinde Encounter Case : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलिसांना दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी ठणठणीत आहे, काहीही चिंता करु नका, असा सल्ला विरोधकांना दिला.
“इंडिया आघाडी लोकसभेसाठी निर्माण झाली”
“दोन प्रमुख पक्षांचे नेते होते. महाविकासआघाडी ठणठणीत आहे, काहीही चिंता करु नका. लोकसभेला, विधानसभेला एकत्र लढलो. काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरुस्त करु. आमच्यात संवाद राहिला पाहिजे आणि तो संवाद सुरु झालेला आहे. हेच सकारात्मक आहे. महाविकासआघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अद्याप कोणतीही आघाडी नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री राजीनामा देणार का?
“अक्षय शिंदेचे एन्काऊंटर फेक होते. ते पूर्णपणे खोटे आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचे एन्कांऊटर करण्यात आले. राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केली केली का? जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवून हा प्रकार घडला अशी माझी माहिती आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“त्या प्रकरणात सरकारने नेमलेल्या एका न्यायालयीन समितीने जो अहवाल आला तो धक्कादायक आहे. या पूर्वी सुद्धा देशामध्ये एन्काऊंटर झालेले आहेत. 90 टक्के एन्काऊंटर अशा पद्धतीने झालेले आहेत. बदलापूरच्या प्रकरणात साऱ्या देशाचं लक्ष होतं. सरकारने नेमलेल्या न्यायालयीन समितीने त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे खोटं कुंभांड रचलं आहे. न्यायालयाने किंवा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय करायचं ते ठरवायचं आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री राजीनामा देणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.