Published on
:
20 Jan 2025, 1:25 pm
Updated on
:
20 Jan 2025, 1:25 pm
केज: संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी संबंधित असलेले खंडणी प्रकरणातील एसआयटी कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामीन अर्जावर आज (दि. २०) सुनावणी होणार होती. परंतु, त्याच्या वकिलांनी पुढील तारखेची मागणी केल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.
याबाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. त्या आवादा एनर्जी या पवन चक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्या जामीन अर्जावर दि. १८ जानेवारीरोजी केज येथील ' क ' स्तर दिवाणी न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश मा. एस. व्ही. पावसकर यांच्या न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यानंतर कराड याचे वकील यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांनी न्यायालया समोर अर्ज सादर करून सुनावणीसाठी पुढील तारीख वाढवून मिळण्यात यावी. अशी विनंती केली होती.
त्या नुसार न्यायालयाने पुढील सुनावणी दि. २० जानेवारी रोजी ठेवण्यात आली होती. मात्र, २० जानेवारी रोजी देखील आरोपींच्या वकिलाने न्यायालयाला जामीन अर्जावर सुनावणीसाठी पुढील तारखेची विनंती केली. त्यामुळे आता कराड याच्या जामीन अर्जावर २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. जितेंद्र शिंदे हे काम पहात आहेत.
खंडणी प्रकरणी जरी जामीन मिळाला तरी पुढे काय ?
केज न्यायालयात कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मात्र, त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने तो एस आय टी च्या कोठडीत आहे. जरी त्याला खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाला; तरी मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोकातून मुक्तता होते की नाही ? याची चर्चा सुरू आहे.