Published on
:
20 Jan 2025, 1:40 pm
Updated on
:
20 Jan 2025, 1:40 pm
मुंबई : अमेरिकन सरकारच्या अतिशय प्रतिष्ठेच्या व विविध क्षेत्रातील आश्वासक प्रतिभावंतांसाठी असणाऱ्या “आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम “ ( इंटरनॅशनल व्हिजीटर्स लीडरशीप प्रोग्राम - आयव्हीएलपी ) अंर्तगत उच्चस्तरीय कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील मर्मबंधा गव्हाणे यांची सन्मानजनक निवड करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रम १९४० पासून म्हणजे ८५ वर्षांपासून जगभर राबविण्यात येतो आहे.
अमेरिकन सरकारच्यावतीने भारतातील चित्रपट क्षेत्रातील पटकथा लेखिकांसाठी हा पहिलाच कार्यक्रम आहे. या विशेष कार्यक्रमाचा बीजविषय ‘परिवर्तनासाठी पटकथालेखन’ ( स्क्रीप्टींग चेंज ) असा आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट पटकथा लेखन विषयक नेतृत्व कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च अमेरिकन सरकार करणार आहे.
देशातील पाच महिला पटकथा लेखिकांची निवड
अमेरिकेत जानेवारी -फेब्रुवारी या काळात या आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. चित्रपट विषयक या आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमासाठी भारतातील मर्मबंधा गव्हाणेसह पाच प्रतिभावान व आश्वासक युवा महिला पटकथा लेखिकांची निवड करण्यात आली आहे, त्यात अतिका चौहान , अनुभूती बॅनर्जी , परसीस सोडावॅाटरवाला , पूजा तोलानी यांचा समावेश आहे. मर्मबंधा गव्हाणे या यातील एकमेव मराठी चेहरा आहे हे विशेष होय. नव्या पिढीतील प्रतिभावान व आश्वासक महिला पटकथा लेखिकांसाठी हा आंतरराष्ट्रीय स्तराचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये अमेरिकन चित्रपट सुष्टीतील नामांकित महिलापटकथाकारांशी देवाणघेवाण, संयुक्त लेखन ( कोलॅबरेशन), महिलांविषयक सकारात्मक दृष्टिकोन चित्रपटात प्रतिबिंबित होण्याचे जागतिक प्रयोग , आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संस्थांना भेट व चर्चा होणार आहे.
मर्मबंधा गव्हाणे यांना १६ वर्षांचा पटकथा लेखनातील अनुभव
या संभाजीनगर शहरातील असून त्यांना पटकथा व संवादलेखनातील अनुभव १६ वर्षांचा आहे. त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या फिल्मसिटी मुंबईतील व्हिसलींग वूडस इंटरनॅशनल या फिल्म इन्टीट्यूटमधून दोन वर्षांचा पटकथा लेखन व चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम गुणवत्ता शिष्यवृत्तीसह पूर्ण केला आहे. त्यांनी ‘ नक्षत्र’ या हिंदी चित्रपटाचे व प्रमोद प्रॅाडक्शनच्या ‘फ्रॅाम सिडनी वुइथ लव्ह‘ या ॲास्ट्रेलियात चित्रीकरण झालेल्या हिंदी चित्रपटाचे संवाद लेखन केले . आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅाक्स स्टार स्टुडिओत स्क्रिप्ट रीडर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. फिल्मस्टॉक या मुंबईतील चित्रपट निर्मिती कंपनीत हेड ॲाफ कंटेंट असताना महान लेखक ‘मंटाे’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली गेली. प्रा. डॅा. शुभांगी व प्रा. डॅा. सुधीर गव्हाणे यांच्या त्या कन्या आहेत. मराठवाड्यातील चित्रपट पटकथा लेखिकेचा झालेली ही आंतरराष्ट्रीय निवड गौरवास्पद आहे. या निमित्ताने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.