सध्या सर्वच पक्षांकडून आगामी महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेने मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन युक्ती शोधली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री थेट जनतेच्या भेटीला येणार आहेत. शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये शिवसेना मंत्री जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. यासाठी नागरिकांना बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करावेत, त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने निवेदनाद्वारे म्हटले आहे.
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बाळासाहेब भवनात शिवसेना मंत्री जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी शिकवण होती. याच विचाराने मंत्र्यांनी काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील गोरगरिब जनतेचे गाव, तालुका पातळीवरील तसेच मंत्रालय संबंधित अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे ११ मंत्री आठड्यातील तीन दिवस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील.
सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेणार
बाळासाहेब भवनमध्ये सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सर्वसामान्य लोकांना भेटतील. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनतेची गाऱ्हाणी ऐकतील. सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील.
बाळासाहेब भवन येथे मंगळवारी सकाळी ९ ते ११ या गृहराज्य मंत्री, महसूल राज्यमंत्री, पंचायत राज, अन्ननागरी पुरवठा आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे सर्वसामान्यांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत वित्त, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेता येईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेतील.
बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांना भेटता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटता येईल. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले हे दोन मंत्र्यांना भेटतील, असे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
मंत्री महोदयांना कामानिमित्त भेटीसाठी य़ेणाऱ्या नागरिकांसाठी पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जातील माहिती सविस्तर भरुन आणि कामाच्या विषयाचा उल्लेख करुन मंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहन पक्ष सचिव संजय मोरे यांनी केले आहे. ही माहिती भरण्याचे अर्ज गुगल फॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे मोरे यांनी म्हटले आहे.
शिवसेना मंत्र्यांना भेटण्याचे वेळापत्रक
स्थळ – शिवसेना पक्ष मध्यवर्ती कार्यालय, बाळासाहेब भवन, मुंबई
सोमवार –
- सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मा. मंत्री श्री.उदय सामंत
- सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- मा. मंत्री श्री.प्रताप सरनाईक
- सायं. ४.०० ते ७.०० वा :- मा.मंत्री श्री.दादा भुसे
मंगळवार –
- सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मा. मंत्री योगेश कदम
- सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- मा.आशिष जयस्वाल
- सायंकाळी ४.०० ते ७.०० वा :- १) मा. मंत्री संजय शिरसाट २) मा. मंत्री संजय राठोड
बुधवार –
- सकाळी ९.०० ते ११.०० वा :- मा. मंत्री शंभूराज देसाई सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वा :- मा. मंत्री प्रकाश आबिटकर
- सायंकाळी ४.०० ते ७.०० वा :- १) मा. मंत्री गुलाबराव पाटील २) मा. मंत्री भरतशेठ गोगावले