आम्हाला गुवाहाटी पार्ट -2 ची गरज नाही:आम्हाला भारतभ्रमण करण्याची हौस, दुसरा प्रदेश पाहू, संजय शिरसाट यांचे विधान

2 hours ago 1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. तसेच आपल्याला गुवाहाटी पार्ट -2 करण्याची गरज नसल्याचेही ठणकावून सांगितले आहे. आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करण्याची गरज नाही. आम्ही एखादा दुसरा प्रदेश पाहू. त्याची चिंता कुणीही करू नये, असे ते म्हणालेत. शिरसाट यांनी यावेळी संजय राऊत यांचा महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा दावाही फेटाळला. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होईल. या पार्श्वभूमीवर आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा ठाम दावा केला. तसेच संजय राऊत यांचा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावाही फेटाळला. संजय शिरसाट म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे. संजय राऊत यांचा सर्व्हे सॅटेलाईटद्वारे झालेला आहे. ते जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्व्हे करत नाहीत. ते उडत-उडत सर्व्हे करतात. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत केलेली सर्व विधाने पाहिली, तर ते जे बोलतात त्याऊलट घडल्याचे दिसून येते. संजय राऊत सत्ता जाणार म्हटले की, आमची सत्ता येते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे त्यांनी केलेला दावा आमच्यासाठी शुभ संकेत आहे असे आम्ही मानतो. आमची सत्ता निश्चित येईल असे आम्हाला वाटते. गुवाहाटी पार्ट-2 ची गरज नाही काही राजकीय तज्ज्ञांनी निवडणूक निकालानंतर 'गुवाहाटी पार्ट टू' घडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना संजय शिरसाट यांनी आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करण्याची काहीच गरज नसल्याचे ठणकावून सांगितले. आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करण्याची गरज नाही. आम्ही एखादा दुसरा प्रदेश पाहू. त्याची चिंता कुणी करू नये. भारतभ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे. आमचा देश आहे. आम्ही कुठे जाऊ, कुठे राहू याची चिंता करण्यापेक्षा महायुतीची सत्ता येईल याला आमचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. मतांचा वाढता टक्का महायुतीच्या पथ्यावर संजय शिरसाट यांनी यावेळी मतांच्या वाढलेल्या टक्क्यांचा फायदा महायुतीला होणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, हिंदू बांधवांसह सर्व जातीधर्माच्या लोकांनी महायुतीला पसंती दर्शवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'एक है तो सेफ है' व 'बटेंगे तो कटेंगे'च्या घोषणेलाही लोकांनी मोठी पसंती दर्शवली. त्यामुळे या निवडणुकीत आमचाच विजय होईल हे निश्चित आहे. सरकारच्या योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबी आमच्या पथ्यावर पडणार आहेत. त्यामुळे मतांची वाढलेल्या टक्क्याचा कौल महायुतीच्याच बाजूने असेल आमचा दावा आहे. भाजप मोठा भाऊ, आम्ही त्यांचे सख्खे भाऊ 23 तारखेला निकाल लागू द्या. ज्यांना आव्हान - प्रतिआव्हान द्यायचे असेल त्यांनी आता द्यावे. निकालानंतर खरी परिस्थिती कळेल. त्यानंतर वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील. महायुतीमध्ये सध्या भाजप मोठा भाऊ असल्याचे दिसत आहे. पण ते मोठा भाऊ असले तरी आम्ही त्यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे आमच्यात मतभेद होणार नाहीत. या सरकारवर महिला - भगिनी सर्वात आनंदी आहेत. सरकारने त्यांना बस प्रवास, माझी लाडकी बहीण व मोफत शिक्षणाच्या योजनेसारख्या अनेक सुविधा दिल्यात. या सर्व योजनांमुळे महिलांना एक आधार वाटतो, असे ते म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article