Imran Khan arrested | इम्रान खान यांची भ्रष्टाचार प्रकरणात सुटका, काही तासांतच पुन्हा अटकFile Photo
Published on
:
21 Nov 2024, 7:20 am
Updated on
:
21 Nov 2024, 7:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कथित भ्रष्टाचार प्रकरणात बुधवारी (दि.२०) जामीन मिळाला होता. दरम्यान, काही तासांतच एका प्रकरणात इम्रान यांना आज (दि.२१) पुन्हा अटक करण्यात आली. खान यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असताना २८ सप्टेंबर रोजी रावळपिंडी येथे आंदोलन पुकारले होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अजूनही तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्यांना बुधवारी (दि.२०) जामीन मिळाला होता, पण लगेचच दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली. खान यांनी तुरुंगात असताना निदर्शने केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावर दहशतवाद आणि सार्वजनिक मेळाव्यावरील बंदीचे उल्लंघन यासह अनेक आरोप आहेत. या प्रकरणांमध्ये खान यांची सुटका होण्यापूर्वीच त्यांना पुन्हा एका गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे.
कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काही तासांनंतर तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एका निषेध प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सुटका होण्याची शक्यता मावळली असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये गुरुवारी (दि.२१) म्हटले आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने (IHC) बुधवारी इम्रान खान यांना महागड्या किमतीच्या बल्गेरी दागिन्यांच्या खरेदीशी संबंधित दुसऱ्या तोशाखाना प्रकरणात जामीन मंजूर केल्याने त्यांच्या सुटकेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र काही तासांनंतर, रावळपिंडी पोलिसांनी त्यांना बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद आणि इतर आरोपांनुसार न्यू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली.
डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरूंगातून सुटका होण्यासाठी लाहोर, रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये त्यांच्यावर नोंदवलेल्या सुमारे दोन डझन इतर खटल्यांमध्ये जामीन मिळणे आवश्यक आहे. इस्लामाबाद पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खान यांच्याविरुद्ध राजधानीच्या विविध पोलिस ठाण्यात किमान 62 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्यांच्या पीटीआय पक्षाने सांगितले की पंजाब प्रांतात आणखी 54 गुन्हे दाखल आहेत.