गेल्यावेळी भाजप आणि एकसंघ शिवसेनेचे फाटले. त्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले. तर पुढे शिवसेनेत उभी फुट पडली. शिंदे गट महायुतीसोबत गेला. अडीच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर महायुतीने विधानसभेत घवघवीत यश मिळवलं. काल-परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यानंतर हे दोघे एकत्र येण्याची चर्चा रंगली. दोन्ही गटातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी यावर भाष्य केले.
उद्धव ठाकरे गटला सणसणीत टोला
या सर्व घडामोडींवर संजय शिरसाट यांनी सणसणीत टोला लगावला आहे. त्यांनी या सर्व चर्चेवर ठाकरे गटावर तोंडसुख घेतले आहे. राजकारणात काही घडतही नाही आणि बिघडत नाही. उबाठा गटाच्या काही लोकांमध्ये उतावळेपणा आलेला आहे. त्यांना वाटतंय आपण आता कुठे तरी उडी मारली पाहिजे. म्हणून ते प्रयत्न करत आहेत. मग त्यांना देवेंद्रजी चांगलं काम करत असल्याचं आठवतं. सकाळी मोदीजी चांगलं काम करत असल्याचं सांगतात. संध्याकाळी वाटतं नाही करत. त्यांना फ्रस्टेशन आलेलं आहे. त्याचाच एक भाग आहे. कुठे जायचं हे गोंधळात ते आहेत. त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही हा महत्त्वाचा मुद्दा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हे सुद्धा वाचा
ठाकरे-भाजप एकत्र येणार नाही
कालच फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की रिलेशन असणं वेगळं आणि राजकारण असणं वेगळं. त्यांची आमच्यासोबत युती होणं शक्य नाही असं फडणवीस म्हणाले, याची त्यांनी आठवण करुन दिली. काहीच होणार नाही. भाजप आणि शिवसेना एकत्र येणारच नाही. जे उठसूट रोज मोदींबद्दल अमित शाहांबद्दल घाण विधान करतात त्यांना भाजप कधीच स्वीकारणार नाही. हे तुम्हाला लिहून देतो, असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. तर शिंदे गट आणि ठाकरे गट सुद्धा एकत्र येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची काही गरजच नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाणार नाही. काही चान्स नाही, असे शिरसाट म्हणाले.
भुजबळांची अजितदादांच्या बैठकीला दांडी
भुजबळांना फडणवीस जवळचे वाटत असतील. म्हणून वारंवार बैठका होतात. वारंवार जातात. पण अजितदादांच्या बैठकीत त्यांना करमत नसावं म्हणून ते बैठकीला गेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.