उमेदवारांच्या 442 होर्डिंग्ज:फ्लेक्समुळे अकोला मनपाच्या तिजोरीत 15 लाख रुपये जमा
5 hours ago
1
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली. निकाल जाहीर होण्यास अवघ्या एका दिवसाचा अवधी आहे. या निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी उमेदवारांकडून फ्लेक्स, बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्जचा मोठा वापर केला गेला. शहरातील चौका-चौकात, गल्लीबोळांमध्ये, विद्युत खांब, जागोजागी राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचे ४४२ होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर लागले होते. यामुळे महापालिकेच्या परवाना व बाजार वसुली विभागाला १५ लाखांवर महसूल प्राप्त झाला आहे. निवडणूक काळात प्रचार व प्रसार करण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शहरात फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर लावायचे असल्यास, त्याची रीतसर महापालिकेच्या परवाना व बाजार वसुली विभागाकडे अर्ज करावा लागतो. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात २२४ तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात २१९ फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर लावले होते. शहरात प्रचारासाठी फलक लावण्यासाठी मनपाकडून परवानगी देण्यात येते; परंतु फ्लेक्स, होर्डिंग्जवर प्रकाशक व मुद्रकाचे नाव टाकणे अनिवार्य आहे. त्याशिवाय महापालिकेकडून राजकीय पक्षांना परवानगी मिळत नाही. या परवानगी शुल्काच्या माध्यमातून महापालिकेला आतापर्यंत १५ लाखांवर महसूल प्राप्त झाला आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी गल्लीबोळ, चौक, विद्युत खांब, खुल्या जागा, मैदान आदी ठिकाणी जाहिरात फलक लावावे लागत आहेत. त्यासाठी त्यांना महापालिका प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मनपाकडून एका पावतीवर २५ ते ३० जाहिरात फलकांना परवानगी देण्यात आली होती. आता निवडीच्या स्वागताचे फलक लागणार विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर अकोला पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या स्वागताचे फलक शहरभर झळकणार आहेत. त्याच्या माध्यमातून महापालिकेला आणखी काही लाखांचा महसूल मिळणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)