Published on
:
24 Nov 2024, 1:06 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:06 am
माढ्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व असलेल्या आ बबनराव शिंदेंना माढ्यात शरद पवार गटाच्या अभिजीत पाटील यांच्या विजयामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या पराभवामुळे तीस वर्षे एकहाती सत्ता असलेला शिंदेंचा गड उध्वस्त झाला आहे. अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून मोहिते-पाटील यांनी शिंदेंना माढ्याच्या कुस्तीत चितपट केले.
यंदाच्या निवडणुकीत माढ्यात मोठा उलटफेर पाहावयास मिळाला. आपली पुढची पिढी विधानसभेत सक्रिय करताना आ. बबनराव शिंदे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी चिरंजीव रणजित शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते. सुरुवातीस शरद पवार गटाकडे तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यात यश येत नाही हे पाहून महायुतीपासून फारकत घेत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चिरंजीवास उतरवले. शिंदेनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजी सावंत आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजीराजे कांबळे या विरोधकांना आपल्या गोटात सामील करुन घेतले.
सत्तेचे केंद्रीकरण, मतदारांना गृहीत धरण्याची वृत्ती, साखर कारखानदारी भोवती केंद्रीत राजकारण या प्रकारामुळे विरोधकांनी मतदारांच्या मनात निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार केले. बदल हवा आमदार नवा ही घोषणा युवकांना प्रेरणा देऊन गेली. उमेदवार रणजितसिंह शिंदे यांनी शेतकर्यांच्या जमिनींवर परस्पर काढलेले कर्ज, बेदाणा उत्पादकांची नाराजी, नातेवाईकांची ठेकेदारी या सारख्या अनेक प्रश्नांमुळे निर्माण झालेली जनतेच्या मनातील नाराजी शिंदेंना भोवली. अभिजित पाटील यांनी निवडणूकीच्या पूर्वी कृषी सांस्कृतिक महोत्सव, दहीहंडी उत्सव, कुस्त्यांचे मैदान, बैलगाडा शर्यती याच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न त्यांना जसा फायदेशीर ठरला त्याच प्रमाणे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रतीटन 3500 रुपयाचा जाहीर केलेला ऊस दर तालुक्यातील ग्रीन बेल्ट मध्ये परिणामकारक ठरला. यामुळे तालुक्यातील 78 गावात शिंदेना मताधिक्य मिळवणे कठीण गेले.
येथेच त्यांची तालुक्यातील मतदारांवर असलेली पकड सुटली. अभिजीत पाटील यांच्या विजयासाठी मोहिते-पाटील आक्रमकपणे सक्रिय झाले होते. लोकसभेवेळचे सहकारी चुळबूळ करताहेत हे लक्षात येताचा त्यांनी तो होणारा तोटा भरुन काढण्यासाठी लावलेली फिल्डींग यशस्वी ठरली. खा. मोहिते-पाटील यांनी आक्रमकपणे शिंदेवर शाब्दिक हल्ला चढवला. विजयसिंह मोहिते-पाटील प्रकृतीची पर्वा न करता अनेक सभेत सहभागी होत होते. अनेकांच्या भेटी घेत होते. शरद पवारांचे आक्रमक भाषण मोठा परिणाम करुन गेले.