एकाधिकार खरेदी केंद्रात 50 शेतकऱ्यांचीच नोंदणी:पहिल्याच दिवशी इंटरनेटअभावी शेतकरी ताटकळल्याने नाराजी व्यक्त

4 days ago 2
हरसूल आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक विभागातर्फे हरसूल येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे नाव नोंदणीस मंगळवारपासून (दि. १९) प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी हरसूल, ओझरखेड अशा ४९ गावातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र एका दिवसात फक्त ५० शेतकऱ्यांचीच नोंदणी सायंकाळपर्यंत झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील केंद्रावर दोन कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे सातबारा, आधारकार्ड, बँक तपशील, तसेच सामायिक क्षेत्रातील संमतीपत्रासह संबंधित शेतकऱ्याचे बायोमेट्रिक घेण्यास सुरुवात करण्यात आली. नोंदणीसाठी गर्दी करणाऱ्या अनेक आदिवासी शेतकऱ्यांची कागदपत्रे संबंधित कर्मचाऱ्यांनी दाखल करून घेतली. एकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर राज्य शासनाच्या ॲप्सला नावनोंदणी करण्यासाठी पुरेशी इंटरनेट सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आदिवासी विकास महामंडळाकडे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या मोबाइल ग्रुपला धान्य खरेदी नोंदणीचा संदेश पाठवल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. आदिवासी भागात इंटरनेट सुविधा नसल्याने अनेक आदिवासी बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ^ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ओझरखेड या गुजरात सरहद्दीवरील गावावरून मी नावनोंदणीसाठी आलो. परंतु मोबाइल ॲपमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास उशीर लागत असल्याने माझ्याकडील कागदपत्र जमा करून घेतले खरे, परंतु अंगठा देण्यास पुन्हा यावे लागणार आहे. - सदू चौधरी, शेतकरी, ओझरखेड इंटरनेटच्या रेंजअभावी ताटकळत बसलेले आदिवासी शेतकरी. हमीभावाकडे लक्ष धान्य खरेदी नोंदणीस पहिल्याच दिवशी योग्य प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाताला किती व कधी भाव जाहीर होईल याबाबत उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी ^शेतकऱ्यांचे कागदपत्रे पडताळणी करून बायोमेट्रिक केले जात आहे. भाव हे कृषी विभाग ठरवणार आहे. त्यानुसार पुढील धान्य खरेदीचे नियोजन केले जाईल. - योगेश भागवत, कर्मचारी, आदिवासी विकास महामंडळ

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article