शनिवारी (दि. 18) हजारो पर्यटकांनी गडावर गर्दी केली होती. गडाच्या गुंजवणी, पाल खुर्द पायी मार्गासह तटबंदी बुरुजाखाली तसेच पद्मावती माची, संजीवनी माची, सुवेळा माची, राजसदर, प्रवेशद्वारांच्या परिसरात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, कचर्याचे ढीग पाहायला मिळाले. गडावर मुक्कामासाठी तसेच खाद्यपदार्थ विक्रीस बंदी आहे. याबाबत पुरातत्व विभागाने वेल्हे पोलिसांना पत्र दिले आहे.
तसेच गड व परिसरात सूचनाफलकही लावला आहे. मात्र, पुरातत्व विभागाच्या आदेशाला मूठमाती देत शेकडो पर्यटक राजगड किल्ल्यावर पद्मावती मंदिर व इतर ठिकाणी मुक्काम करत आहेत. तसेच, खाद्य पदार्थ विक्रेते ऐतिहासिक वास्तूंसह जागा मिळेल तेथे खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत. त्यामुळे गड व परिसरात कचर्याची समस्या गंभीर झाली आहे.
विक्रेत्यांकडून पहारेकर्यांना दमदाटी
पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले की, पर्यटकांना मुक्कामास मनाई करूनही शेकडो पर्यटक गडावर मुक्काम करतात. तसेच चुलीवर स्वयंपाक करून अनेक विक्रेते खाद्यपदार्थांची विक्री करत आहेत. याबाबत वेल्हे पोलिसांना पुरातत्व खात्याच्या वतीने तक्रार दिली आहे. तरीही गडावर 15 ते 20 विक्रेत्यांनी ठाण मांडले असून, ते आम्हाला दमदाटी करतात. वन विभागाच्या समित्या पर्यटकांकडून प्रत्येकी पाच रुपये घेतात. मात्र, गडावरील कचरा गोळा करत नाहीत.
गडाचे पावित्र्य राखण्यासाठी गडावर पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ घेऊन जाणार्या पर्यटक व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना माघारी येताना रिकाम्या बाटल्या, कचरा घेऊन येण्याची सक्ती करावी. हा नियम न पाळणार्यांवर प्रशासनाने कारवाई करावी.
- विनोद दिघे, कार्याध्यक्ष, मावळा जवान संघटना
राजगड किल्ल्याच्या वनक्षेत्रात नियमितपणे कचरा गोळा केला जात आहे. पुरातत्व खात्याच्या हद्दीतील तटबंदी बुरूज ऐतिहासिक वास्तूंवर कचरा पडतो, तो गोळा करण्याची जबाबदारी पुरातत्व खात्याची आहे.
- मनोज महाजन, वनरक्षक, राजगड