एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही:एकनाथ खडसेंची मला कीव येते, गिरीश महाजनांनी सगळेच सांगितले

2 hours ago 2
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असल्याचे दिसत आहे. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पक्षात प्रवेशासाठी मला विरोध केला, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी मी पहिल्यांदा बघतो आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. गिरीश महाजन म्हणाले, ते म्हणतात मी त्यांना विनंती केली. प्रवेशही झाला. फोटोही काढले. पण ते मला घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही. मला एकनाथ खडसेंची आता कीव यायला लागली आहे. पुढे महाजन म्हणाले, एकनाथ खडसे हे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी पहिले आहे. कॉंग्रेस पक्षाने त्यांना 90 च्या दशकात पक्षात घेतले, तिकीट दिले आणि आमदार केले. पंधरा ते वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. त्यांच्या सारखा मी कॉंग्रेसमध्ये नव्हतो. नंतर ते भाजपमध्ये आले. पण मी भाजपमध्ये सुरुवातीपासून होतो. अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, तुमच्या मतदारसंघात तुम्ही का पडले? तुमची कुठलीतरी ग्रामपंचायत आहे का? तुमच्या मतदारसंघात नगरपालिका तरी आहे का? काय आहे तुमच्या मतदारसंघात? असा सवालच गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. एकदा 1400 मतांनी निवडून यायचे, तर कधी 1800 मतांनी निवडून यायचे, तुमचे आणि माझे मताधिक्यातील फरक केवढा आहे बघा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. गिरीश महाजन म्हणाले, पारोळ्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी त्यांना चांगले सुनावले की, पोरीची निवडणूक आली की पोरीचे काम करायचे, सुनेचे काम आले की सुनेचे काम करायचे. यांची कमाल आहे, दुसरीकडे कोणी नको सगळ्या ठिकाणी आम्हीच पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे आणि हे लोकांना कळायला लागले आहे. त्यांनी कितीही अश्लील आणि काहीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघांमध्ये माझा जनतेचा विश्वास माझ्यावर आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. केवळ पद भोगायची, बडबड करायची, एवढेच काम त्यांच्याकडे राहिले आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे ते वाह्यात सारखे काही बोलत आहेत. बोलण्यासारखे तर माझ्याकडे सुद्धा खूप आहे. मी बोलायचे ठरवले तर त्यांना पळता भुई होईल. वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलेन, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article