ऑरिक सिटीसह दुय्यम निबंधकाचाही बनवला बनावट शिक्का:1800 स्क्वेअर मीटरचा प्लॉट 10.84 लाखांना केला विक्री

2 hours ago 2
ऑरिक सिटीसह येथील दुय्यम निबंधकाचेही एका भामट्याने बनावट शिक्के तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑरिकतर्फे शेतकऱ्यांना परत मिळणाऱ्या १५ टक्के भूखंडाचे व्यवहार याच बनावट शिक्क्यांच्या आधारे केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये १८०० चौरस मीटरचा प्लॉट १० लाख ८४ हजार ४७४ रुपयांना विक्री करत एका शेतकऱ्याची फसवणूक केली. याच प्रकारे भामट्याने सहा शेतकऱ्यांना गंडवत एक कोटीपेक्षा जास्त पैसे उकळले. या रजिस्ट्री आणि त्यांचे चलान ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत. मात्र, ऑरिकचेच अधिकारी व पोलिस हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) संपादित जमिनीपैकी १५ टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत केला जातो. हेच भूखंड रोडटच मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने आठ ते दहा शेतकऱ्यांची खोटी रजिस्ट्री करून फसवणूक केली. यासाठी त्याने चक्क ऑरिक सिटीचे आणि ऑरिकच्याच दुय्यम निबंधकांचेही बनावट शिक्के बनवले. या आधारे तब्बल एक कोटीवर व्यवहारही केल्याची माहिती आहे. एक शेतकरी ऑरिकमध्ये ताब्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षे त्याने हे पैसे वापरले. दरम्यान, फेब्रुवारी २०२३ मध्ये १८०० स्क्वेअर मीटरच्या प्लॉटचा हुबेहुब शिक्क्याच्या आधारे १०.८४ लाखांना व्यवहार केला होता. ऑरिकच्या नावे बँक खातेही, सल्ल्यासाठी जालन्याचा वकील ऑरिकचे शिक्के बनवून प्लॉट विकण्यासह पैशांच्या व्यवहारासाठी ऑरिकच्याच नावे जालन्यातील एका बँकेत खातेही उघडण्यात आले होते. शेतकऱ्यांचे पैसे याच खात्यात जमा करण्यात आले. या बोगस व्यवहारासाठी भामट्याने जालन्याचा एक वकीलही सल्ल्यासाठी नियुक्त केला होता, अशी माहिती एका शेतकऱ्याने दिली. दरम्यान, ऑरिकच्या नावे बँकेने बनावट खाते उघडलेच कसे, असा प्रश्न निर्माण होतो आहे. ऑरिक, पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? ऑरिकसारख्या संस्थेच्या नावे बनावट शिक्के बनवले जातात. तसेच बनावट बँक खातेही उघडले जाते. मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ पोलिसांत साधी तक्रार दिली जाते. विशेष म्हणजे ऑरिकच्या तक्रारीत स्पष्टता नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे यात ऑरिकच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा गंभीर प्रकरणातही पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या भामट्याला साधे चौकशीसाठीही बोलावले नाही. त्यामुळे पोलिसांच्याही भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ऑरिकच्या तक्रारीत अस्पष्टता- विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक ऑरिककडून आलेल्या तक्रारीमध्ये स्पष्टता नाही. त्यांच्याकडून प्रकरण कसे घडले, कोण सहभागी आहे याबाबत स्पष्टता आल्यास निश्चितच पुढील कारवाई केली जाईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article