ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा केला जात आहे. मात्र यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता शिवसेना वि. शिवसेना असा कलगीतुरा रंगला असून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. शिवेसाना उबाठा ही काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असा खोचक टोला म्हस्के यांनी लगावला.
महाबंडलेश्वर संजय राऊत बांडगुळाची भूमिका करत आहेत
महाबंडलेश्वर संजय राऊत यांनी आज सकाळी शिवसेना शिंदे गटावर आरोप केले, ते आम्हाला ॲपेंडिक्स म्हणाले, ते तर पोटात असतं. पण आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध म्हणजे शिवसेना ठाकरे गट आहे.काँग्रेसच्या झाडावरती संजय राऊत हे बांडगुळाची भूमिका करत आहेत. आज राहुल गांधींची दुपारी पत्रकार परिषद आहे, याची माहिती संजय राऊत हे पत्रकारांना देत होते. किती वाईट अवस्था झालेली आहे, राऊत यांना शिपायाचं काम करावं लागत आहे, अशा शब्दांत म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली.
राऊत, आम्हाला ॲपेंडिक्स म्हणत असतील, ते तर पोटात असतं, पण आपण ( ठाकरे गट) मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं ते मला सांगण्याची गरज नाही. आपण अशा पद्धतीने टीका करत असाल तर आम्हालाही त्या भाषेत उत्तर देता येतं, असंही म्हस्केंनी सुनावलं. ठाकरे गट हे संपूर्णपणे रिकाम होणारं आहे. ठाकरे गटाला घरघर लागली आहे. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठआकरे, एवढीच मंडळी आता तिकडे राहणार आहेत, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज त्यांचं ( शिंदे गट) ऑपरेशन करतात. त्यांचा रोज अपमान होत आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. पोटात ॲपेंडिक्सची एक गाठ असते. ती कधीही कापली जाऊ शकते. आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ॲपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत, त्याची तुम्ही काळजी घ्या, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली होती.