कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हे वाढतच चालले आहेत. गेल्या आठवड्यातच कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांकडून एका मराठी तरुणाला मारहाण झाल्याच प्रकरण समोर आलं होतं. त्या तरूणाने आक्रमक होत एका व्हिडीओद्वारे मनातूल खदखड व्यक्त केली होती. तर डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये उच्चभ्रू वस्ती एका मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. हे सर्व कमी की काय म्हणून आता कल्याण पश्चिमेकडे आता तृतीयपंथीयांची गुंडगिरी सुरू झाली आहे. खडकपाडा भागात तिघा तृतीयपंथीय आणि त्यांच्या साथीदाराने एका महिलेला अडवत तिच्याकडे 20 हजारांची जबरदस्तीने मागणी केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली, एवढंच नव्हे तर त्यांनी अश्लील वर्तन करत त्या महिलेसह तिच्या लहान मुलीला मारहाणही केली. या भयानक प्रकारामुळे कल्याण शहरात दहशतीचे वातावरण असून सामान्य नागरिक तर जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पैसे मिळाले नाही म्हणून तृतीयपंथीयांची महिलेस लाथा-बुक्क्यांनी मारहाण
हा धक्कादायक प्रकार 5 दिवसांपूर्वी घडला होता. मात्र या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने धाडस करून अशी वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गृहिणी खडकपाड्यातील फ्लॉवर व्हॅली भागात राहतात. मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला घेऊन ही गृहिणी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात जात होती. सोसायटीच्या गेटबाहेर बाहेर पडताच कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात राहणाऱ्या तिघा तृतीयपंथीय आणि त्यांच्या सोबत असलेल्या एका साथीदाराने या गृहिणीला अडवले.
त्यानंतर शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. मात्र त्या महिलेने पैसे देण्यास इन्कार केल्यानंतर त्या चौघांनी मिळून गृहिणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय 20 हजार रूपये न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. इतकेच नव्हे तर तृतीयपंथीयांनी गृहिणीशी अश्लील वर्तन करत तिच्या लहान मुलीला सुद्धा मारहाण केल्याचा आरोप आहे. यामुळे ही महिला प्रचंड घाबरली, मात्र आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नय, आणि त्या तृतीयपथीयांच्या गुंडगिरीला आळा बसावा म्हणून त्या महिलेने तृतीय पंथीयांविरुद्ध त्यांच्या संस्थेच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती. मात्र आपल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे लक्षात आल्यावर गृहिणीने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंबीर दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.