Published on
:
24 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:45 am
मुंबई ः संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माहीम मतदारसंघात अखेर अमित ठाकरे यांना दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना जबरदस्त धक्का बसला आहे. अमित ठाकरे थेट तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. सोबतच या निवडणुकीत मनसेच्या इंजिनला करकचून ब्रेक लागला.
ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी निवडणूक लढविण्यासाठी इरेला पेटलेले शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना दुसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. खरे तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचे जन्मस्थळ माहीम. या मतदारसंघात हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे असतानाच शिंदे सेनेने रिंगणात उडी घेतली. त्यामुळे ही लढत तिरंगी झाली. अमित ठाकरे पहिल्यांदाच राजकारणाच्या आखाड्यात आपले नशीब आजमावून पाहत होते. माहीम मतदारसंघाच्या समस्या मला तोंडपाठ आहेत, असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगत असल्यामुळे त्यांच्या विजयाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांच्यापुढे महेश सावंत आणि सदा सरवणकर असे दुहेरी आव्हान होते. त्यांच्या विजयाचा रस्ता सोपा व्हावा, यासाठी महायुतीतून जोरदार प्रयत्न झाले. विशेषतः भाजप नेत्यांनी सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती अनेकदा केली. तथापि, निवडणूक लढविण्यावर सरवणकर ठाम राहिले. कारण, या मतदारसंघात त्यांचे स्थान असून, महेश सावंत यांचीही मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यामुळे ‘राज’पुत्राची वाट सोपी नाही, असा सुरुवातीपासूनच अंदाज होता.
दुसरीकडे, विद्यमान आमदार सरवणकरांनाही माहीमच्या जनतेने नाकारल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंची साथ न देणे आणि गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणपतीच्या मिरवणुकीत झालेला गोळीबार आदी प्रकरणे सरवणकरांना भोवल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे.
यातील दखल घेण्याजोगी बाब म्हणजे गेल्या विधानसभेला आदित्य ठाकरेंसाठी राज ठाकरेंनी वरळीतून रस्ता मोकळा सोडला होता. मात्र, यावेळी उद्धव काकांनी पुतण्या अमितसाठी मार्ग रिकामा केला नाही. सरवणकर यांनी न घेतलेली माघार, ठाकरे गटाने केलेला प्रचार यामुळे अमित ठाकरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. सरवणकर यांचा कडवा विरोधक अशी महेश सावंत यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच ठाकरे गटाने यावेळी सावंत यांना संधी दिली होती. त्या संधीला सावंत यांनी न्याय मिळवून दिला. यावेळी मतदारांनी अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यापेक्षा जास्त पसंती सावंत यांना दिली. त्यामुळेच माहीम विभागात यावेळी आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाला.