Published on
:
05 Feb 2025, 9:39 am
Updated on
:
05 Feb 2025, 9:39 am
शिरूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे गेल्याने इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दीर्घकाळ नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांनी आम्ही किती दिवस कार्यकर्ते सांभाळायचे तसेच किती वर्षे भावी नगरसेवक म्हणून मिरवायचे? असा सवाल शासनाला केला आहे. निवडणुका पुढे गेल्याने नगरसेवक होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अनेक ठिकाणी हे इच्छुक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत तसेच विविध प्रकारे खर्च करताना दिसत आहे. कोरोना काळ संपल्यानंतर निवडणूक होईल, अशी आशा भावी नगरसेवकांना होती. मात्र, त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका आल्या. त्यातच ओबीसी आरक्षणाचे भिजत घोंगडे सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या.
दरम्यान, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नगरपरिषदेच्या निवडणुका होतील, या आशेने भावी नगरसेवकांनी आपापल्या विधानसभा उमेदवारांचे काम प्रामाणीकपणे केले व आपण कसे प्रमुख दावेदार आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता निवडणुका पुन्हा सात ते आठ महिने पुढे गेल्याने इच्छुकांनी काढता पाय घेतला असून, वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांचे काही देणे-घेणे नसून आम्ही काय कायम भावी नगरसेवक म्हणून मिरवायचे का? असा संतप्त सवाल निवडणुका पुढे गेल्यामुळे इच्छुकांनी व्यक्त केला आहे.
शिरूर नगरपरिषदेची निवडणूक 15 डिसेंबर 2016 रोजी झाली होती. त्याची मुदत 2021 मध्ये संपली. त्याच वर्षी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, चार वर्षे निवडणुका न झाल्याने पूर्ण एक कार्यकाळ 2026 ला जो पूर्ण झाला असता तो वाया गेला आहे. यामुळे इच्छुकांची संख्या दुप्पट झाली आहे.
अनेक विकासकामे ठप्प
प्रदीर्घ काळ निवडणूक न झाल्याने त्याचा विकासावर परिणाम झाला असून, नगरसेवक व नगराध्यक्ष जे धोरणात्मक निर्णय घेऊ शकतात ते प्रशासक घेऊ शकत नसल्याने शहरातील अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. या गोष्टीला जबाबदार कोण? असा प्रश्न येत असला, तरी निवडणुका वेळेत झाल्या असत्या, तर दुसरी निवडणूक आता आली असती, हे नक्की.
अनेकांचे स्वप्न भंगले
शिरूर नगरपरिषदेवर 2007 पासून प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष व 21 नगरसेवक आणि दोन स्वीकृत नगरसेवक होते. मात्र, निवडणुकीला दहा वर्षे झाल्याने अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले आहे.