कुंभमेळ्यात 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा; मोदी, शहा आणि योगींनी याची जबाबदारी घ्यावी!

11 hours ago 2

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यावी, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

प्रयागराजमधील चेंगराचेंगरीत 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेकडो जण गंभीर जखमी आहेत. अनेक महिला, अबाल, वृद्ध, बेपत्ता आहे. एक प्रकारे तिथे अराजकता पसरली आहे. यामुळे महाकुंभचा संपूर्ण परिसर आर्मीच्या ताब्यात द्यावा. त्यामुळे इथे शिस्त लागेल, असे बहुतेक महामंडलेश्वर महाराजांनी म्हटले होते. काल जे घडलं ती एक राजकीय दुर्घटना आहे. त्याला राजकीय नेते जबाबदार आहे. आणि योगी सरकार, केंद्र सरकारचं व्हीआयपी, व्हीव्हीआयपी कल्चर जबाबदार आहे. ज्या प्रकारे संपूर्ण यंत्रणा व्हीव्हीआपींच्या सेवेत लागली आहे, तिथे सामान्य भाविकांना वाऱ्यावर सोडलं गेलं. अमृत स्नानासाठी तिथे कोट्यवधी लोक आले होते. भाजपला वाटलं हे सगळे आपल्या पक्षाचेच लोक आहेत. जे आपल्यालाच मत देतात, ते कुठे जातील. सगळे मोदींचे अंध भक्त आहेत. लोक आले पण त्यांची काहीच व्यवस्था नव्हती, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

प्रशासनाला आणि सरकारला हे माहित होतं. पण रोज 20 कोटी येणार, 10 कोटी येणार, 3 कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्याचं एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होतं. त्यात भारतीय जनता पक्षाच्या व्हीव्हीआयपींनी, राजकीय व्हीव्हीआयपींनी अशा वेळेला दूर राहीलं पाहिजे होतं. संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री अन्य केंद्रीय मंत्री यांच्यासाठी एक-एक दिवस तो संपूर्ण परिसर बंद करण्यात आला. अन्य मंत्री किंवा अन्य व्हीआयपींसाठी हीच व्यवस्था लावल्यावर एक-एक दिवस भाविक हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोहोचू न शकल्याने ती गर्दी वाढली. त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला. कोणतीही व्यवस्था नाही, अॅम्ब्युलन्स नाहीत. वैद्यकीय सुविधा नाहीत. आर्मीच्या ताब्यात महाकुंभची व्यवस्था द्या, असे तिकडले काही महामंडलेश्वर सांगत होते. पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली. अनेकदा अशा गर्दीमुळे चेंगराचेंगरी होते. याला जबाबदार उत्तर प्रदेशचं योगी सरकार आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

9 हजार कोटी कोणाच्या खात्यावर गेले?

कुंभमेळ्यासाठी 10 हजार कोटींचे बजेट करण्यात आलं. पण सांगितलं जातंय प्रत्यक्षात १ हजार कोटींच्यावर खर्च झालेला नाही. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधारण ८ ते ९ हजार कोटींचा हिशेब लागणारच नाही. आता तिथे किरीट सोमय्यांना पाठवायचं आहे. किरिट सोमय्या जे भाजपचे, सरकारचे, मोदी-शहा आणि ईडीचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी तिथे प्रत्यक्ष जायला पाहिजे. १० हजार कोटींचा कुंभमेळा १ हजार कोटीत कसा अटोपला? ९ हजार कोटी कोणाच्या खात्यावर गेले? कोणत्या संस्था? कोणत्या संघटना? कोण राजकारणी? याचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल ईडीला द्यायला पाहिजे, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार?

महाराष्ट्रातले काही लोक तिथे होते. त्यांचा आक्रोश आपण पाहिला असेल. कशा प्रकारे अव्यवस्था होती? कशा प्रकारे लोकांना तुडवलं गेलं? कशा प्रकारे या अपघातानंतर दुर्लक्ष झालं? हे महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांनी प्रयागराजमध्ये वृत्तवाहिन्यांवर येऊन सांगितलं. हा अत्यंत गंभीर विषय आहे. योगी असतील, मोदी असतील, अमित शहा असतील या सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जे 100 लोकं मृत झाले आहे, तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करणार आहेत? याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article