Published on
:
31 Jan 2025, 1:05 am
Updated on
:
31 Jan 2025, 1:05 am
कुडाळ : फॉरेक्स मार्केटअंतर्गत फॉरेन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून तीच रक्कम आर्बिटेजमध्ये यूएसए डॉलर स्वरूपात गुंतवणूक केल्याचा बहाणा केला व भरघोस परतावा मिळाल्याचे भासवत सतीश परशुराम नाईक (वय 51, रा. अभिनवनगर कुडाळ) यांची सुमारे 42 लाख 41 हजार 483 रु. ची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली.
गुंतवणूक केलेली रक्कम इंडियन रुपीजमध्ये कनव्हर्ट करण्यासाठी 22 लाख 50 हजार 88 रु. घेतले. याप्रकरणी दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
सतीश नाईक यांनी फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 12 जुलै 2023 रोजी फेसबुकवर क्वांटम कॅपिटल या कंपनीची जाहिरात पाहिली. यामध्ये वैयक्तिक माहिती भरण्याबाबत नमूद करण्यात आले होते; मात्र नाईक यांनी यामध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती भरली नाही. यानंतर 15 जुलै 2023 रोजी अभिषेक वर्मा नावाच्या व्यक्तीने नाईक यांना व्हॉटस्अॅपवर ऑडिओ कॉल करून आपल्या कंपनीची माहिती देण्यास सुरुवात केली. आपली कंपनी एक फॉरेन ट्रेडिंग आणि फॉरेन शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये सक्रिय असणारी कंपनी आहे. आतापर्यंत अनेकांना फॉरेन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबाबत मोलाचे मार्गदर्शन करून भरघोस नफा मिळवून दिलेला आहे. अशी माहिती दिल्यानंतर नाईक यांनी या कंपनीमध्ये अकाऊंट उघडून सहभागी होण्याची सहमती दर्शवली. यासाठी प्रथम लागणारे चार्जेस म्हणून 8525 रुपये रक्कम गुगल पे ने पाठवली. यानंतर यातील अभिषेक वर्मा यांनी या ट्रेडिंगमध्ये साहाय्य करण्यासाठी अनिल कुमार यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
यानंतर 15 जुलै रोजी अनिल कुमार यांनी नाईक यांना व्हाट्सअॅप कॉल करून त्यांचा विश्वास संपादन करत एक लिंक त्यांच्या व्हाट्सअॅप वर पाठवली . ही लिंक नाईक यांनी गुगल क्रोमद्वारे ओपन केल्यावर तिथे त्यांना एका वेब अॅड्रेसवर अभिषेक वर्मा यांनी काढून दिलेले एक ट्रेडिंग अकाउंट दिसले. हे ट्रेडिंग अकाउंट नाईक हे केवळ पाहू शकत होते मात्र ते हाताळू शकत नव्हते. या अकाऊंटचा पूर्णतः एक्सेस डव्हायझरकडे होता. यानंतर नाईक यांनी या अकाऊंट वर गुंतवणूक स्वरूपात 18 जुलै रोजी 30 हजार, 25 जुलै रोजी 28 हजार 400 रू. 5 ऑगस्ट रोजी 50 हजार 304 रु. 9 ऑगस्ट रोजी 60 हजार 0325 रू. , 26 ऑगस्ट रोजी 59 हजार 995 रू, तसेच अन्य एकदा 3 लाख 60 हजार अशी एकूण 5 लाख 88 हजार रुपये रक्कम प्राथमिक टप्प्यात गुंतवली. यानंतर अधून मधून या खात्यात नाईक यांनी पैसे गुंतवणे सुरूच ठेवले होते.
यानंतर नाईक यांना त्यांनी गुंतवलेल्या एकूण 42 लाख 41 हजार रू. रकमेचे 2 कोटी 36 लाख 54 हजार एवढी रक्कम आता आपल्याला मिळणार आहे असे सांगण्यात आले. मात्र ही रक्कम इंडियन रुपीस मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 22 लाख 50 हजार एवढी रक्कम भरणा करण्यास सांगण्यात आली. ही रक्कम नाईक यांनी भरणा न केल्यास त्यांचे अकाऊंट सीझ होणार आहे. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची व वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेऊन ही रक्कम त्यांना पाठवली. मात्र त्यांनी सांगितलेली सर्व रक्कम प्रोसेसिंग फी पाठवूनही त्यांना त्यांची नफ्यासहितची रक्कम मिळत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी कुडाळ पोलिसात धाव घेत गुरुवारी फिर्याद दाखल केली. यानुसार अभिषेक वर्मा ( रा.केरळ), अनिल कुमार (रा.उत्तर प्रदेश), आरव शर्मा (रा.कर्नाटक), समीर शर्मा (रा.कर्नाटक) , अंबर गील (रा.दिल्ली),अविनाश दास (रा.दिल्ली) या संशयितांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.