कुरुंदात मध्यवर्ती बँकेची सात लाख रुपये असलेली तिजोरीच चोरट्यांनी पळविली:पोलिसांकडून गावातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
4 hours ago
2
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शटर उचकटून चोरट्यांनी त्यातील तिजोरीच पळविल्याची घटना रविवारी ता. 19 सकाळी उघड झाली आहे.या तिजोरीमध्ये सात लाख रुपये असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूलाच परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. शनिवारी ता. 18 बँकेचे कामकाज झाल्यानंतर दिवसभरातील व्यवहाराची रक्कम बँकेत एका ओट्यावर ठेवलेल्या तिजोरीमध्ये रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी घरी निघून गेले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी तिजोरी फोडून रक्कम नेण्याऐवजी चक्क तिजोरीच उचलून वाहनात टाकून पळविली. आज सकाळी बँकेचे शटर अर्धवट उघडे दिसल्यामुळे काही गावकऱ्यांनी पोलिस व बँक प्रशासनाला कळविले. वसमतचे उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, कुरुंद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार बालाजी जोगदंड यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या शिवाय बँकेचे अधिकारी व कर्मचारीही दाखल झाले आहेत. या तिजोरीमध्ये सुमारे सात लाख रुपये असल्याचे बँकेकडून सांगण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी तिजोरी पळवितांना बँकेच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे , डीव्हीआर देखील पळविला. त्यामुळे बँकेत नेमके किती चोरटे आले होते, किती जणांनी मिळून तिजोरी उचलली याचा अंदाज पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने आता कुरुंदा गावात येणाऱ्या मार्गावरील दुकानाच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)